भिवंडीतील काही गावांत होडीतून गणेशाचे आगमन

जगभरातून भारतात येणाऱ्या मालाची गोदामे असल्याने व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचे शहर असलेल्या भिवंडीतील रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून त्याचा फटका या भागातील गणरायाच्या आगमनावरही दिसून आला. भिवंडी परिसरातील काही गावांमध्ये रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून या रस्त्यांवरून रडतरखडत मिरवणूक आणण्यापेक्षा बुधवारी तब्बल एक हजार गणेशमूर्ती काळू नदीतून होडीतून आणण्यात आल्या.

दोन वर्षांपूर्वी भिवंडी-कल्याण तालुक्याला जोडणाऱ्या काळू नदीवरील नांदकर-आंबिवली पुलाचे लोखंडी पत्रे कोसळले. त्यामुळे हा पूल बंद करण्यात आला. तेव्हापासून येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. मुसळधार पावसामध्ये या परिसरातील १५ ते २० गावांतील नागरिकांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. दैनंदिन बाजारासाठी कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथे ये-जा करण्यासाठी नांदकर पुलाचा वापर करायचे. मात्र हा पूल धोकादायक झाल्याने येथील ग्रामस्थांच्या सोयीसाठी येथे एक

होडी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नदी किनारी बंदर नसल्याने शाळेतील, विद्यार्थी, आजारी रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, दुधवाले, भाजीवाले यांना गुडघाभर पाण्यातून नागरिकांना होडीत जावे लागते. यंदा गणेशोत्सवातही ग्रामस्थांना होडीतूनच गणेशमूर्ती आणाव्या लागल्या.

भिवंडीच्या पूर्वपट्टय़ातील नांदकर, सांगे, किरवली, ईताडे, आमणेपाडा, आमणे, बापगांव, मूठवळ, पिसे, चिराडपाडा, वासेरा, चौधरपाडा, सावद, देवरुंग, लोनाड, भावाळे आदी गावातील गणेशभक्त कल्याण, उल्हासनगरमधून गणेश मूर्ती खरेदी करतात. मात्र त्या गावामध्ये नेण्यासाठी त्यांना कल्याणपासून १५ ते २० किलोमीटर प्रवास करावा लागतो. या मार्गावरील रस्त्याची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थांनी यंदाही होडीतूनच गणेश आगमनाची मिरवणूक काढली.

Story img Loader