ठाण्यात सध्या सुरू असलेल्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलकडे ठाणेकरांची पावले वळू लागली आहेत. येत्या काही दिवसांतच संपूर्ण ठाणे शहर हे कला-क्रीडा महोत्सवात व नाटय़संमेलनात रंगणार आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच ठाणेकर नागरिकांना आपली कला सादर करता यावी यासाठी महापौर संजय मोरे यांच्या संकल्पनेतून शहरात २३ जानेवारीपासून कला-क्रीडा महोत्सव सुरू होणार आहे.ठाणेकर निश्चितच सहभागी होतील यात शंका नाही.
ठाणे महापौर चषक अंतर्गत शहरात विविध स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धामध्ये राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होऊन आपल्या कलेचे दर्शन ठाणेकरांना घडवितात. परंतु जिल्हा व राज्यस्तरावरील खेळाडूंची कला ठाणेकरांना अनुभवता यावी तसेच स्थानिक खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळावे यासाठी यंदापासून या स्पर्धाना कला-क्रीडा महोत्सवाचे स्वरूप देण्यात आले आहे. या महोत्सवात कबड्डी, खो-खो, शरीरसौष्ठव, अ‍ॅथलेटिक्स, मल्लखांब, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक, जलतरण, बुद्धिबळ, ब्रासबॅण्ड, लोककला, क्रिकेट या स्पर्धा होणार असून यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय खेळाडू सहभागी होऊन आपली कला सादर करणार आहेत. मात्र पुढील वर्षी या सर्व स्पर्धामध्ये ठाणे जिल्हा व स्थानिक पातळीवरील खेळाडूंना सहभागी करून घेतले जाणार आहे. आपल्या शहरातीलच खेळाडूंना संधी मिळावी असा मोरे यांचा हेतू आहे. यंदा होणाऱ्या या कला-क्रीडा महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा, पथनाटय़, पाककला, नृत्यस्पर्धा, मिस ठाणे, मास्टर ठाणे या स्पर्धा २३ ते ३१ जानेवारीपर्यंत प्रभाग समितीनिहाय होणार आहे. या स्पर्धामधून निवड झालेले स्पर्धक हे अंतिम फेरीत दाखल होणार असून सर्व स्पर्धाच्या अंतिम फेऱ्या या १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार आहे.
ठाणे शहरात भव्य-दिव्य व एकत्रित असा कला-क्रीडा महोत्सव यंदा प्रथमच महापौरांच्या संकल्पनेतून व अध्यक्षतेखाली होत आहे. यंदा झालेल्या ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन स्पर्धेत सर्वधर्मीय संस्था, संघटना यांना सामावून घेण्यात आले होते. आणि त्यालाही ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तलावांचे ठाणे शहर आता कलावंतांचे शहर अशीही ओळख निर्माण करू लागले आहे. रंगभूमीवर आपली कला सादर करणारे रंगकर्मी, बालकलाकार ठाण्यात वास्तव्यास आहेत, तसेच विविध स्पर्धामध्येही ठाणेकर खेळाडू सहभागी होऊन ठाण्याचे नाव सर्वत्र गाजवत आहेत. ३१ डिसेंबरची रात्र असो की, भारतीय नववर्ष स्वागत यात्रा असो ठाणेकर उत्साहाने सहभाग घेतात हे ८४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सर्वानी पाहिले आहे. मग राजकारणातील नेते असोत, कलावंत असोत की सर्वसामान्य ठाणेकर यांच्या एकजुटीचे दर्शन हे घडतेच, त्यामुळे या महोत्सवालाही ठाणेकर यशस्वी करतील.

– प्राची