पॅरिसवर झालेले दहशतवादी हल्ल्याचे वास्तव पाहताना अनेकांचे डोळे पाणावले असतील. या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले. पॅरिसमधील या हल्ल्याचे कोम्बिंग ऑपरेशन करताना एक कुत्रा त्याच्या गुणवैशिष्टय़ांमुळे अतिशय उपयुक्त ठरला. मात्र आपली जबाबदारी पार पाडताना हा कुत्रादेखील या हल्ल्यात शहीद झाला. आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयुक्त असणारे हे कुत्र्याचे ब्रीड होते जर्मन शेफर्ड..
ज र्मनीमध्ये १८९९ च्या काळात जर्मन शेफर्ड या श्वान ब्रीडची नोंद व्हायला लागली. मात्र त्यापूर्वीच जर्मन शेफर्ड हे ब्रीड अस्तित्वात होते. १८९९ च्या दरम्यान जर्मनीमध्ये एसव्ही क्लब स्थापन झाल्यावर जर्मन शेफर्ड हे ब्रीड विकसित व्हायला सुरुवात झाली. या ब्रीडला विकसित करण्यास आणि ब्रीडला नावारूपाला आणण्यात जर्मनीतील एसव्ही क्लबचा मोलाचा वाटा आहे. दरवर्षी युरोपात सिगर स्पर्धा भरवली जाते. या स्पर्धेत केवळ जर्मन शेफर्ड या ब्रीडचा समावेश असतो. या स्पर्धेत जगभरातून साधारण १५०० पेक्षा जास्त जर्मन शेफर्ड सहभागी होत असतात. यातील पहिल्या दहा नर आणि मादी जर्मन शेफर्डला जगभरात मोठय़ा प्रमाणात मागणी असते.

धनगरी कुत्रे आणि राखणदारी
जर्मनीमध्ये मेंढय़ांचे रक्षण करण्यासाठी धनगरी कुत्रे म्हणून हे कुत्र्याचे ब्रीड वापरले जायचे. यावरूनच जर्मन शेफर्ड, असे या ब्रीडचे नाव पडले. राखणदारीसाठी हे कुत्र्याचे ब्रीड अतिशय उपयोगी असते. पोलीस दल, सैन्य दलात जर्मन शेफर्ड कुत्र्यांचा जास्त उपयोग होत असतो.

किंग ऑफ ब्रीड
जर्मन शेफर्ड हा कुत्रा दिसायला रुबाबदार असतो. या कुत्र्याचे चालणे, दिसणे राजेशाही थाटात असते. शरीरयष्टी ताकदवान असते. त्यामुळे इतर कुत्र्यांपेक्षा या कुत्र्याचे वेगळेपण त्याच्या मजबूत, तडफदार शरीरयष्टीमध्ये दिसून येते. म्हणूनच या कुत्र्याला ‘किंग ऑफ ब्रीड’ असे म्हटले जाते.

समतोल आहार आणि सतत ग्रुमिंग
या कुत्र्यांची शरीरयष्टी कायम मजबूत ठेवण्यासाठी आहार योग्य असावा लागतो. आहारात समतोल असणे महत्त्वाचे असते. साधे खाद्यपदार्थ या कुत्र्याला दिल्यास ते पुरेसे ठरत नाही. योग्य प्रमाणात प्रथिने या कुत्र्यांना आहारातून मिळणे आवश्यक असते. अलीकडच्या काळात कुत्र्यांचे अनेक खाद्यपदार्थ बाजारात उपलब्ध असल्याने या तयार खाद्यपदार्थामध्येही आहाराचा योग्य समतोल राखलेला असतो. या कुत्र्याच्या शरीरावर लांब किंवा मध्यम आकाराचे केसांचे आवरण असते. त्यामुळे सतत त्यांच्या शरीरावरून हात फिरवणे, शरीराची तपासणी करणे याकडे मालकांना लक्ष द्यावे लागते. तसे न झाल्यास त्वचारोग होण्याची शक्यता असते. डॉबरमनपेक्षा या कुत्र्याची रोगप्रतिकारकशक्ती नाजूक असते. थंड प्रदेशातील हे कुत्रे असल्याने भारतातील वातावरण त्यांना फारसे योग्य नसते. थंड वातावरण या कुत्र्यांसाठी नेहमी उपयुक्त ठरते.

वैशिष्टय़े
जर्मन शेफर्ड हे कुत्रे सर्वगुणसंपन्न असतात असे म्हटले जाते. उत्तम राखणदारीसाठी ते ओळखले जातात. या ब्रीडमध्ये आत्मविश्वास असतो. पोलीस दलात उपयुक्त असणारे हे कुत्रे घरात पाळण्यासाठीही तितकेच उपयुक्त असतात. आपल्या मालकाशी त्यांचे भावनिक नाते पटकन जुळते. हे कुत्र्याचे ब्रीड संयमी असल्याने बॉम्ब शोधून काढण्यासाठी, नार्को परीक्षणासाठी, अमली पदार्थ शोधून काढण्यासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनात या ब्रीडचा उपयोग होतो. एखादी लपून बसलेली व्यक्ती शोधून काढण्यात हे कुत्र्याचे ब्रीड वापरले जाते. प्रशिक्षणामध्ये या कुत्र्यांची आकलनक्षमता जास्त असते. कुत्रे दिसायला मजबूत शरीरयष्टीचे असले तरी लहान मुलांसोबतही सहज राहू शकतात.
जर्मन शेफर्ड हे ब्रीड जगभरात लोकप्रिय झाल्यावर अनेक कॅनल्समध्ये हे ब्रीड विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हैदराबादचे नवाब नझीर यार जंग यांनी त्यांच्या पैगा कॅनलमध्ये जर्मन शेफर्ड हे ब्रीड मोठय़ा प्रमाणात विकसित केले. अली हैदर यांनी हे ब्रीड पूर्वी विकसित केले तसेच सध्या पुण्यातील संजय देसाई जर्मन शेफर्ड हे ब्रीड विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.