आई-वडिलांच्या कुशीत जाते तेच खरे बालपण; परंतु कित्येक बालकांच्या नशिबी असे बालपण येतच नाही. रस्त्याच्या कोपऱ्यावर किंवा कचराकुंडीजवळ फेकून दिलेल्या या निष्पाप कोवळ्या जीवाला मग कुठल्या तरी अनाथाश्रमात स्थान मिळते. तेच त्याचे कुटुंब बनते. अशा अनाथ मुलांना आई-वडिलांच्या प्रेमाची उणीव भासणार नाही, अशा पद्धतीने लळा लावून त्यांचे संगोपन करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. अशाच संस्थांमध्ये डोंबिवलीतील जननी आशीष संस्थेचा समावेश करता येईल. समाजाप्रति आपलेही काही देणे लागते, या विचाराने प्रेरित होऊन डोंबिवलीतील २१ महिलांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली. गेली २२ वर्षे ही संस्था पूर्वीइतक्याच जिव्हाळ्याने आणि जिद्दीने अनाथांचा आधारवड बनण्याचे काम करत आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक महिलांना आपण काही तरी सामाजिक काम करावे, असे वाटत असते. मात्र एकटय़ाने ते शक्य नसते. याची जाणीव झाल्यानंतर डोंबिवलीतील डॉ. कीर्तिदा प्रधान, पुष्पलता पाटील, जयश्री मोकाशी, शोभा किणी, सुधा ओतीव, बीना धूत, जयश्री देशपांडे, आशा भगत, स्नेहल कर्णिक, सुलभा धोंडे यांसह २१ महिलांनी एकत्र येत जननी आशीष या संस्थेची स्थापना केली आहे. १९९३ मध्ये स्थापन झालेली जननी आशीष ही संस्था अनाथ तसेच नको असलेल्या मुलांचे संगोपन व त्यांना दत्तक देण्याचे काम पाहते. ठाणे जिल्ह्य़ातील अनाथ मुलांसाठी काम करणारी ही पहिली संस्था आहे.
या विषयी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. कीर्तिदा प्रधान सांगतात, १९८९ मध्ये मुंबई दूरदर्शनवरील एका कार्यक्रमातून अनाथांसाठी काम करणाऱ्या संस्थेची माहिती झाली. त्यातूनच अनाथ मुलांना आश्रय देणारी एखादी संस्था सुरू करण्याचा विचार मनात आला. त्या वेळी आमच्याकडे काही नव्हते, माझ्या मैत्रिणी व मी धावपळ करुन इतर परिचितांकडून मदत मिळवून संस्थेसाठी जागा मिळविली. त्यानुसार डोंबिवलीतील औद्योगिक विभागात पेंढरकर रस्त्याला लागूनच कोपऱ्याला आम्हाला मोक्याची जागा मिळाली. जागा मिळाल्यानंतर आमच्या घरातील मंडळींनी तसेच नातेवाईकांनी आम्हाला इमारत बांधणीसाठी हातभार लावला. त्यांच्या सर्वाच्या प्रयत्नामुळेच ही संस्था २२ वर्षांची वाटचाल करू शकली असून यापुढेही चांगले कार्य करेल.
सुरुवातीला महिलांच्या पाच हजार रुपयांच्या वर्गणीतून ती सुरू झाली. त्यानंतर दानशूर व्यक्तींनी दिलेल्या अनुदानावरच ही संस्था आत्तापर्यंत आपला खर्च भागवित आली आहे. नवजात शिशू अवस्थेपासून ते सहा वर्षांपर्यंतची बालके येथे ठेवली जातात. मात्र आता १३ ते १४ वर्षांपर्यंतची मुले पोलिसांमार्फत येतात. त्यांचीही सोय येथेच करावी लागते. संस्थेत २५ मुलांची राहण्याची क्षमता आहे; परंतु येथे सध्या ४०च्या आसपास मुलांनी आधार घेतला आहे. तर आत्तापर्यंत येथील साडेतीनशेहून अधिक मुलांना दत्तक देण्यात आले आहे.
विशेष बालकांचीही देखभाल
सर्वसामान्यांबरोबरच विशेष बालकेही येथे आश्रयास आहेत. ठाणे जिल्ह्यात दोनच संस्थांमध्ये ही सोय आहे एक नेरुळचे विश्वबालक केंद्र व दुसरे डोंबिवलीतील जननी आशीष संस्था. विशेष बालकांच्या गरजा सामान्य बालकांपेक्षा वेगळ्या असतात. त्यांना समजून घेणारी व्यक्तीही तितकीच तज्ज्ञ असायला हवी. त्यामुळे विकलांग अनाथ बालकांसाठी कार्य करणाऱ्या समाजसेवी संस्थांचीही कमतरता आहे. त्यासाठी आता शासनानेच पुढाकार घेण्याची गरज आहे. या विशेष बालकांचे संगोपन करण्यात संस्थांना काही स्तरावर मर्यादा येतात. वयाच्या पाच वर्षांपर्यंत संस्थांमध्ये या बालकांचे संगोपन केले जाते.
ऑनलाइन पद्धत सदोष
गेली काही वर्षे अनाथ आश्रमातून मुले दत्तक घेण्यासाठी पालकांची प्रतीक्षा यादी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्यासाठी पालकांना अनेक चौकशींना तोंड द्यावे लागते, संस्थेत हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे पालकांचा वेळ आणि हेलपाटे वाचावेत म्हणून केंद्राने मुल दत्तक घेण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. त्यात ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला आहे. पालकांनी ऑनलाइन अर्ज भरून मुलांच्या छायाचित्रावर क्लिक करून आता आपले बाळ निवडायचे आहे. ऑन लाइन अर्ज भरावयाचे असून जी संस्था घरापासून जवळ आहे त्या संस्थेची नावे द्यायची आहेत. अर्ज भरल्यानंतर संस्थेतर्फे तीन बाळांचे फोटो ऑन लाइन दाखवले जातील, त्यातून जे मुल आवडले असेल त्याचा फोटोला क्लिक करायचे आहे. यामुळे कोठून पालक आले आहेत, त्यांचे स्वभाव, राहणीमान याचा काहीच ताळमेळ संस्थांना लागत नाही. अशा प्रकारे केवळ छायाचित्र पाहून बाळाची निवड करणे हे अयोग्य आहे. छायाचित्र व प्रत्यक्ष बाळ यांच्या दिसण्यात फरक असतो. तसेच संस्था चालकांची जबाबदारी यामुळे केवळ एक केअर टेकरची राहील असे वाटू लागल्याची खंत या संस्थेच्या पदाधिकारी म्हणतात.
जननी आशीष संस्था, डोंबिवली