‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’ ही उक्ती तंतोतंत कृतीत आणत तंजावरची मराठी संस्कृती या विषयावर प्रबंध व ग्रंथ लिहून विद्या मनोहर गाडगीळ यांनी इतिहासप्रेमींसाठी एक अनमोल ‘अक्षर’ लेणेच साकारले आहे.
विद्याताई मूळच्या औरंगाबादच्या. वडील व्यंकटेश वळसंदकर पब्लिक स्कूलचे प्राचार्य आणि आई आशा शिक्षिका. घरात असे शिक्षणाचे वारे वाहत होतेच. त्यातच कुशाग्र बुद्धीचे वरदान विद्याताईंना लाभल्यामुळे इतिहासात सुवर्णपदक पटकावून त्या एम. ए. झाल्या. धुळ्याला काही दिवस नोकरी करीत असताना इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. प्र. न. देशपांडे यांच्या त्या संपर्कात आल्या. डॉक्टरेट करण्याचा मानस होताच. विद्याताईंमधील हुशारी ओळखूनच देशपांडे सरांनी ‘तंजावरची मराठी संस्कृती’ या अत्यंत अवघड, क्लिष्ट, अस्पर्शित, अनवट विषयाचे सूतोवाच केले. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याची विद्याताईंची तयारी होतीच. त्याच वेळी स्ट्रक्चरल इंजिनीअर मनोहर गाडगीळ यांच्याशी विवाह करून त्या, आधी कल्याण आणि मग ठाण्यात कोरस टॉवरमध्ये स्थिरावल्या.
देशपांडेसरांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई परिसरातील सगळी ग्रंथालये विद्याताईंनी धुंडाळली; पण तंजावरसंबंधी काहीच माहिती मिळाली नाही. अखेर दीड वर्षांची कन्या कोमल, तिच्याकडे लक्ष द्यायला आई आणि यजमान यांच्यासह त्यांनी तंजावरकडे महिन्याभरासाठी प्रस्थान ठेवले. तंजावरच्या भूमीवर पाऊल टाकताच सभोवतालचा रम्य परिसर, आल्हाददायक हवामान, वाऱ्याच्या पुढाकाराने सळसळणारी हिरवी कल्पतरूंची तटबंदी बघून त्या हरखून गेल्या. तंजावरच्या सरस्वती महालात, आशियातील सगळ्यात मोठय़ा ग्रंथसंग्रहालयात त्यांनी पाऊल टाकले. महिनाभर त्यांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि जास्तीत जास्त ‘कागद’, भूर्जपत्रं, ताडपत्र अभ्यासले. सुदैवाने त्या मोडी लिपीतज्ज्ञ असल्यामुळे काम सुलभ झाले. तमिळ भाषेतील कागदपत्रांसाठी थोडी दुभाष्याची मदत घ्यावी लागली. माहितीच्या खजिन्याची दारं किलकिली होऊ लागली. तिथे आजमितीस असंख्य ‘रुमालां’च्या नोंदी अजून बाकी आहेत. या संशोधनात मराठेशाहीचा इतिहास तंजावरशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, हे वास्तव त्यांना जाणवले. तंजावरमधील समर्थ रामदासांच्या आठ मठांनाही त्यांनी भेटी दिल्या. तिथे टाळ-मृदुंग-चिपळ्या यांच्या साथीने सीताकल्याण म्हणजे सीतेचे लग्न हे आख्यान लावलेले कीर्तन ऐकायला मिळाले. अंगाला चंदन लावल्यानंतर चैत्राची खासियत असलेले आंब्याची डाळ व पन्हं यांचा घेतलेला आस्वाद म्हणजे मराठी संस्कृती अस्तित्वात असल्याचे जणू प्रात्यक्षिकच, तंजावरच्या सरदारांनी, जनतेने या कामात इतके सहकार्य केले की, मागच्या जन्मी आपण ‘तंजावरी’ असू, याची विद्याताईंना खात्री वाटते.
तमिळनाडूतील तंजावर म्हणजे मराठी लोकांच्या अस्तित्वाची मोहर उमटलेलं अतिदक्षिण टोक. चोल, पांडय़, चालुक्य, नायक यांच्या अभिरुचीने नटलेले तंजावर शिवाजी महाराजांचे सावत्र कनिष्ठ बंधू व्यंकोजी यांनी स्वपराक्रमाने जिंकून घेतले. तिथे तमिळ व मराठी संस्कृतीचा मिलाफ घडून आला. सर्व सरदारांच्या ‘राण्या’ या महाराष्ट्राच्या माहेरवाशिणी आहेत. १८० वर्षांच्या भोसले राजवटीत सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय भरभराट झाली. भारतातील पहिली मुलींची शाळा, १६९० मध्ये पहिले मराठी नाटक ‘लक्ष्मी नारायण संवाद’, माधवस्वामीनी महाभारतावर रचलेल्या १९००० ओव्या, ४६ पंडितांचा निवास असलेले शहाजीपूरमनगर, उत्तम अश्वपरीक्षा असलेला, छापखाना चालू करणारा, फ्रेंच, लॅटिन, ग्रीक, इटालियन भाषेवर प्रभुत्व असणारा, बनारसहून आणलेल्या किमती ग्रंथाची जपणूक करणारा, भरतनाटय़म, संगीत जपणारा दुसरा सरफोजी, आजही संगीताच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण मानला जाणारा तुळजाराजा याचा संस्कृत ग्रंथ संगीत सारामृत, कोरवंझी हा वैशिष्टय़पूर्ण नाटय़प्रकार हे सगळे तंजावरच्या मराठी संस्कृतीचे शिल्पकार आहेत.
या सगळ्या संशोधनाच्या आखीवरेखीव मांडणीची इतिश्री झाली. विद्याताईंच्या ‘तंजावरचे राज्य आणि मराठी सत्ता-राजकीय व सांस्कृतिक संबंध’ या प्रबंधात. वैचारिक, सांस्कृतिक विचारांच्या या मेजवानीला उत्कृष्ट प्रबंध म्हणून डॉ. जिनसीवाला पुरस्कार प्राप्त झाला आहे. पॉप्युलर प्रकाशनने महाराष्ट्रापासून शेकडो योजने दूर असलेल्या तंजावरमधील मराठीच्या वैभवाचा हा इतिहास पुस्तकरूपाने प्रकाशात आणला. २००३ साली ‘तंजावरची मराठी संस्कृती’ या पुस्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा दत्तोवामन पोतदार पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. २०१४ मध्ये मराठवाडा भूषण पुरस्काराने विद्याताईंना गौरविण्यात आले. या सर्व वाटचालीत सासरची सर्व मंडळी व धुळ्याची बहीण कल्पना पटवर्धन यांचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले.
प्रबंध हातावेगळा केल्यानंतर पूर्ण वेळ अध्यापनाची नोकरी दुसरीकडे मिळत असतानाही केवळ या मुलांनाही कोणीतरी शिकवायला पाहिजेच ना, या तळमळीनेच त्यांनी पी.डी. कारखानीस कला-वाणिज्य महाविद्यालय, अंबरनाथ येथील अर्धवेळ नोकरी स्वीकारली. वेळ प्रसंगी झाडाखालीही वर्ग घेतला. २४ वर्षे इतिहास विभागप्रमुखपदी काम करून नुकतीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. राज्य स्तरावर, राष्ट्रीय स्तरावर इतिहास परिषदेचे आयोजन, त्यात ८० पेपरांचे वाचन, नागपूर-नांदेड येथे डॉक्टरेट पदव्यांसाठी परीक्षक यात त्या व्यग्र होत्या. प्राचीन भारताची देणगी या आवडत्या विषयावरील व्याख्यानातून सुवर्णयुगाची ओळख सर्वाना, विशेषत: भावी पिढीला व्हावी यासाठी त्या सतत प्रयत्नशील आहेत. आयबीएनवरील मुलाखतीतून भिडस्त स्वभावाच्या विद्याताई सर्वदूर पोहोचल्या आहेत. विद्याताईंच्या योगदानामुळे तंजावरची मराठी संस्कृती इतिहासजमा न होता जगासमोर आली आहे. खरंच विद्याताईंनी ‘इतिहास’ घडवला आहे.