tvlogया उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या श्रवण, वाचन, भाषण, गणन व श्रुतलेखन या क्षमतांची तपासणी करण्यासाठी चाचण्या घेण्यात येणार आहेत, त्याविषयी..
काही महिन्यांपूर्वी एका संस्थेने सार्वजनिक उपक्रमांतर्गत चालणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगतीचा आढावा घेतला होता. त्या तपासणीचे निष्कर्ष जाहीर झाले आणि शिक्षण क्षेत्रातील कटू वास्तव त्यातून दिसून आले. या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील सरस्वती मंदिर मराठी शाळेच्या व्यवस्थापनाने स्वत:च्या शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रगती जाणून घेण्यासाठी सजगपणे पाऊल उचलले आहे.
संस्थेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील काही इयत्तांच्या विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांची तपासणी करण्यासाठी चाचण्या घेतल्या जाणार आहेत. शाळेचे व्यवस्थापन मंडळ आणि पालक-शिक्षक संघ यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने सर्व पालकांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. वार्षिक परीक्षेनंतरचे दिवस त्यासाठी नक्की करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या हक्काच्या सुट्टीतही व्यत्यय येणार नाही, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत सरस्वती मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या श्रवण, वाचन, भाषण, गणन आणि श्रुतलेखन या क्षमतांची तपासणी करण्यासाठी चाचण्या घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने या हितकारक असल्याने सर्व विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असणार आहेत.
श्रवण चाचणीअंतर्गत एक उतारा चांगल्या आवाजात ध्वनिमुद्रित करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी लिहितील. यामध्ये विद्यार्थी एकाग्रतेने ऐकून त्यातील विषय समजून घेऊन ते शब्दांमध्ये कसे व्यक्त करतात, ते स्पष्ट होतील.
वाचन चाचणीअंतर्गत शालेय पुस्तकाच्या बाहेरील एखादा उतारा विद्यार्थी कशा रीतीने वाचतात, त्याची पाहणी केली जाईल. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांला विशिष्ट वेळ दिला जाईल. म्हणजेच श्रवण चाचणीअंतर्गत श्रवण आणि आकलनक्षमतांची, तर वाचन चाचणीअंतर्गत वाचनकौशल्याची परीक्षा घेतली जाईल.
भाषण चाचणीअंतर्गत विद्यार्थ्यांना दिलेल्या विषयांमधील एका विषयाची निवड करून त्यावर मग स्वत:चे विचार मांडायचे. दिलेल्या वेळेत विषयाची निवड करून त्यावर विद्यार्थ्यांला मुद्देसूदपणे विचार मांडायचे आहेत.
गणन चाचणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या पाठय़पुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित ५० प्रश्नांची गणन कसोटी घेण्यात येणार आहे. यावरून प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातील गणिती संकल्पनांचे आकलन किती प्रमाणात झाले आहेत, ते स्पष्ट होईल.
श्रवणलेखन चाचणीअंतर्गत एका उताऱ्याची निवड केली जाईल. तो ऐकता ऐकता लिहिण्यासाठी सांगितला जाईल (डिक्टेक्ट). इथे वाचनाची पुनरावृत्ती होणार नाही. विद्यार्थ्यांच्या श्रवण, शुद्धलेखन, हस्ताक्षर, मनाची एकाग्रता, इ. क्षमतांची कसोटी इथे लागणार आहे. अशा प्रकारच्या चाचण्यांचे आयोजन हा सरस्वती मराठी शाळेच्या योजनेचा पहिला टप्पा आहे. भविष्यात इंग्रजी, विज्ञान, इ. विषयांसाठीदेखील टप्प्याटप्प्याने चाचण्या आयोजित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
चाकोरीबद्ध मार्गाने वाटचाल करण्यापेक्षा प्रयोगशील शाळा काळाचा वेध घेत, भविष्याची गरज लक्षात घेऊन बदल करीत राहतात. स्वत:चे आत्मपरीक्षण करून योग्य ते बदल करण्याच्या दृष्टीने राबविला जाणारा हा उपक्रम म्हणूनच अनुकरणीय आहे.
हेमा आघारकर