येथील कैलासनगरमध्ये राहणाऱ्या अथर्व लोहार या सहा वर्षीय मुलाने थायलंडमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय एकल तबला वादन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे.
२६ ते ३० डिसेंबरदरम्यान बँकॉक येथे ‘कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिग आर्ट’ या संस्थेतर्फे विविध कलांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात पुणे येथील अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या वतीने अथर्वने या स्पर्धेत भाग घेतला. अंबरनाथ येथील गुरुकृपा संगीतालयात वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून अथर्व तबला शिकत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहा वर्षांचा गट नसल्याने अथर्वला ८ ते ११ वयोगटातील स्पर्धकांशी लढत द्यावी लागली. मात्र तरीही स्पर्धेत त्याचे तबला वादन सर्वात उजवे ठरले.
प्रशिक्षक सुनील शेलार, वडील मनोज लोहार आणि आई शीतल लोहार यांनी अथर्वच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.