ठाणे : शहापूर येथील सरलंबा भागात गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर बुधवारी हातभट्टी चालविणाऱ्या सात ते आठ जणांनी लाठय़ाकाठय़ा आणि हत्यारांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

सरलंबा येथे गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण बळीप, पोलीस हवालदार काशिनाथ सोनवणे, रणजित पालवे, भाऊ बेंडकुळे, अतुल खेडकर, गृह रक्षक संतोष हुमणे यांचे पथक घटनास्थळी गेले. पोलिसांनी तेथील सुमारे तीन लाख रुपयांचे साहित्य उद्ध्वस्त केले. या कारवाई दरम्यान, येथील सात ते आठ हातभट्टी चालकांनी अचानक पोलिसांवर प्राणघातक हल्ला केला. यात पोलिसांच्या गाडीची, वायरलेस मशीन, मोबाइल या वस्तूंची तोडफोड केली. तसेच पोलीस उपनिरीक्षक किरण बळीप, अतुल खेडकर यांना लाठय़ाकाठय़ांनी जबर मारहाण करून जखमी केले. तर संतोष हुमणे यांच्या डोक्यावर हत्याराने हल्ला करून  घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हल्ल्यात जखमी झालेल्या तिघांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.