कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेना-भाजपमध्ये लढत रंगली आहे. या लढतीचे रूपांतर आता हाणामारीत होण्यास सुरुवात झाली आहे.

डोंबिवलीनंतर आता कल्याणमध्ये शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. प्रचाराचे फलक फाडण्यावरून झालेल्या या भांडणात रामबाग विभाग भाजपच्या महिला उमेदवाराचा नातेवाईक रितेश सिंग याला शिवसैनिकांकडून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचा रामबाग महिला उमेदवाराचे नातेवाईक रितेश सिंग व विशाल मोरे हे गुरुवारी पहाटे प्रचारासाठी लावलेल्या फलकांचीे पाहणी करण्यासाठी मोटारसायकलवरून फिरत होते. कल्याण मुरबाड रोडवरील त्यांच्या कार्यालयाजवळील फलक साहिल डोंगरा व मित्तल आसवानी हे फाडत असल्याचे त्यांना दिसले. या दोघांना रितेश यांनी बॅनर का फाडत आहात अशी विचारणा केली. त्यांना डोंगरा व आसवानी यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. विशाल यांच्या हातावर डोंगरा याने दारूची बाटली मारून कारमध्ये बसून उल्हासनगर दिशेने पळ काढला. या प्रकरणी विशाल यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात आसवानी व डोंगरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी साहिल डोंगरा याला ताब्यात घेतले आहे.