बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या २५ जणांवर आरटीओची कारवाई; आयुर्मान संपलेल्या पाच रिक्षा जप्त  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवलीत आरटीओ अधिकाऱ्यांनी २५ रिक्षा जप्त केल्या आहेत. यात पाच रिक्षा या कालबाह्य़ असल्याचे स्पष्ट झाले. कल्याणधील कारवाईनंतर डोंबिवलीत कालबाह्य़ झालेल्या रिक्षांकडे आरटीओने मोर्चा वळविला आहे. शहरात  गुरुवारी सायंकाळी आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेल्या रिक्षांच्या चाचणीत २५ रिक्षाचालक नियमबाह्य़ रिक्षा चालवीत असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मुजोर रिक्षाचालकांना वठणीवर आणण्याची प्रवाशांनी मागणी केली होती. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक, आरटीओ अधिकारी प्रवीण कोतकर, संतोष कठार, अविनाश मराठे यांच्या पथकाने रिक्षांची तपासणी मोहीम सुरू केली. पोलिसांनी कोपर उड्डाणपुलाजवळ सापळा रचून पोलीस संरक्षणात ही कारवाई केली.

रस्त्यावर बेशिस्तपणे  रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली. या वेळी रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला विरोध केला. रिक्षा बंदचा इशारा रिक्षाचालकांनी दिला. तपासणीत अडथळा येत असल्याचे निदर्शनास येताच आरटीओ अधिकाऱ्यांनी रिक्षा तपासणी सुरूच ठेवली. या तपासणीत २५ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच रिक्षा आयुर्मान संपलेल्या असल्याचे आढळले. अनेक चालकांकडे रिक्षाची कागदपत्रे, परवाना आढळला नाही,तर काहींनी गणवेश न घालताच प्रवासी वाहतूक सुरू ठेवली होती. जप्त रिक्षाचालकांनी कागदपत्रे सादर केल्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू केली जाईल. बेपर्वाईने प्रवासी वाहतूक करताना चालक निदर्शनास आल्यास त्यांचा परवाना काही महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, तसेच जप्त करण्यात आलेल्या भंगार रिक्षा तोडण्यात येतील, असे नाईक यांनी सांगितले.

प्रवासी हिताचा व रिक्षाचालकांना वाहनतळावर उभे राहून प्रामाणिकपणे सेवा देता यावी व बेशिस्त रिक्षाचालकांच्या अरेरावीला आळा घालता यावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे नाईक यांनी सांगितले. येत्या आठवडाभर डोंबिवलीत ही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Auto rickshaw issue in dombivali
First published on: 04-03-2017 at 02:01 IST