किशोर कोकणे लोकसत्ता

ठाणे : व्यावसायिक तसेच नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या भिवंडी- वाडा मार्गाची गेल्या दीड वर्षांपासून चाळण झाल्याने या भागात मोठय़ा आशेने स्थिरावलेल्या उद्योगांची वाताहत सुरू झाली आहे. खराब रस्त्यामुळे अवजड वाहनचालक येथील व्यावसायिकांच्या मालाची वाहतूक करण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना दुप्पट पैसे देऊन मालाची वाहतूक करावी लागत आहे.

भिवंडी- वाडा भागात उद्योजकांसाठी १५ वर्षांपूर्वी कर तसेच विद्युत देयकामध्ये सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक मोठे उद्योजक भिवंडीत, वाडा भागात वळाले होते. सध्या भिवंडी-वाडा मार्गालगत ५०० हून अधिक सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांचे कारखाने तयार झाले. त्यामध्ये कापड, लोखंड, यंत्र गृहउपयोगी वस्तू तयार करण्याच्या कारखान्यांचाही समावेश आहे. सुमारे १५ हजारहून अधिक कामगार या ठिकाणी कामाला येत असतात. दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल या कारखान्यांतून होत असते. येथील उद्योजक        त्यांचा उत्पादित माल देश- विदेश, उरण जेएनपीटी किंवा गुजरातला पाठविण्यासाठी भिवंडी-वाडा मार्गे वाहतूक करावी लागते.

गेल्या दीड वर्षांत भिवंडी- वाडा मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. येथील संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे. खराब रस्त्यामुळे वाहतूक करण्यास मालवाहतूकदार तयार होत नसल्याचे येथील उद्योजकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मालवाहतूकदारांना दुपटीने पैसे देऊन हा माल वाहतूक करण्याची वेळ आली आहे. खड्डय़ांमुळे उत्पादित केलेल्या यंत्राची आदळआपट होऊन तो माल खराब होत असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.

गेल्या वर्षभरात व्यावसायिकांना कोटय़वधीचे नुकसान सहन करावे लागले. अनेकदा उद्योजक व ग्रामस्थ एकत्र येऊन रस्ते बुजविण्याचे काम करतात. त्यामुळे आता उद्योग कसा करावा असा प्रश्न उद्योजकांना पडला आहे.

मालवाहतूकदारांचा नकार

भिवंडी-वाडा मार्गावरील येथील कोपरी भागात कारखाना असलेले चिराग दोषी त्यांचे उत्पादन नवी मुंबईत नेण्यासाठी मालवाहतूकदारांस संपर्क साधत आहेत. परंतु भिवंडी-वाडा रस्त्याचे नाव ऐकूनच मालवाहतूकदार त्यांना नकार देऊ लागले आहेत. अशी समस्या येथील सर्वच उद्योजकांना सहन करावी लागत आहे. अनेक कारखानदारांना जादा पैसे देऊन मालवाहतूकदारांना बोलावत आहेत. तर खड्डय़ांमुळे अनेकदा मालही तुटून खराब होत असतो. त्यामुळे येथील उद्योगांना कोटय़वधी रुपयांचा फटका सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

भिवंडी- वाडा मार्गालगत असलेल्या उद्योजकांना खराब रस्त्यामुळे व्यवसाय करणे कठीण झाले आहे. यासंदर्भाच्या तक्रारी आम्ही सर्व विभागांना केल्या आहेत. खराब रस्त्यामुळे अपघातही घडले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचाही आम्हाला पाठिंबा मिळतो. परंतु या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे लक्ष नाही. सरकारने तात्काळ रस्त्याचे काँक्रीटीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. व्यवसाय व्यवस्थित झाला नाहीतर नागरिकांना रोजगारही उपलब्ध होणे कठीण आहे.

 – अनुराग धवन, सह सचिव, वाडा इंडस्ट्री असोसिएशन.

आम्ही भिवंडी वाडा रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत. प्रशासनाने उद्योजकांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निनाद जयवंत, सचिव, चेंबर्स ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन. तथा टिसाचे भिवंडी शाखेचे अध्यक्ष.