भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या कचरा डब्यांची दुरवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाकडून एकीकडे स्वच्छता राखण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी डब्यांची अवस्था तुटकीफुटकी असल्यामुळे शहर बकाल झाले आहे.

राष्ट्रीय पातळीवर करण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२० उपक्रमात मीरा-भाईंदर शहराला गौरवण्यात आले होते. राज्य पातळीवर चौथ्या तसेच राष्ट्रीय पातळीवर १९वा क्रमांक प्राप्त झाल्यामुळे आरोग्य विभागाचे कौतुक होत असताना शहरात उपलब्ध असलेल्या डब्यांच्या देखरेखीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे.

शहरातील अनेक भागांत असलेले कचऱ्याचे डबे तुटकेफुटके असल्यामुळे नाइलाजाने नागरिकांवर रस्त्याच्या कडेलाच कचरा टाकण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात या कचऱ्यावर अधिक डास वावरात असल्यामुळे आरोग्याच्या समस्यादेखील निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शहरातील तुटक्या डब्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. पालिकेने कचरा टाकण्याचे डबे व्यवस्थित ठेवले तर आम्हाला कचरा टाकणे सोयीचे होईल, असे स्थानिक रहिवासी दीपाली भोसले यांनी सांगितले.

शहरात ज्या ठिकाणी कचऱ्याचे डबे तुटलेले असतील ते संबंधित अधिकाऱ्याला सूचना देऊन या समस्येचे निवारण केले जाईल.

– संभाजी पानपट्टे, उपायुक्त, मीरा-भाईंदर महापालिका