केरळ येथे नुकत्याच झालेल्या ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये बदलापूरकर खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केली असून महाराष्ट्राच्या संघासाठी पदकांची कमाई केली आहे. दर चार वर्षांनी होणारी ही राष्ट्रीय स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जाते. कारण या स्पर्धामध्ये उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या खेळाडूंची राष्ट्रीय संघात निवड होते. या स्पर्धामधील खो – खो व ट्रायअॅथलॉन या खेळांमध्ये बदलापूरच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले.
खो – खोमध्ये मीनल भोईर व कविता घाणेकर यांनी उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. बदलापूर येथे राहणाऱ्या या तरुणींना या कामगिरीमुळे शासनाकडून सरकारी नोकरीची हमीही मिळाली आहे. केरळ येथून बदलापूर येथे पोहचताच शिवभक्त शाळेच्या वतीने त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. या शाळेच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत, तर ट्रायअॅथलॉन या पोहणे, सायकल चालविणे व धावणे असे स्वरूप असलेल्या स्पर्धेत पूनम वरखेडे हिने महिला गटात रौप्यपदक मिळविले आहे. पुरूष गटात प्रफुल्ल जांभळे याने चौथा क्रमांक पटकावला आहे. हे दोघेही बदलापूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर संकुलाचे खेळाडू असून ते ठाणे जिल्हा ट्रायअॅथलॉन असोसिएशनतर्फे या स्पर्धेत सहभागी झाले होते. अशी माहिती त्यांचे प्रशिक्षक व जिल्हा असोसिएशनचे यज्ञेश्वर बागराव यांनी दिली. महाराष्ट्राचा नेटबॉलपटू मयुरेश पवार याचा गूढ मृत्यू झाल्याने ही राष्ट्रीय स्पर्धा चर्चेत आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2015 रोजी प्रकाशित
राष्ट्रीय क्रीडा स्पध्रेवर बदलापूरची मोहोर
केरळ येथे नुकत्याच झालेल्या ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये बदलापूरकर खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केली असून महाराष्ट्राच्या संघासाठी पदकांची कमाई केली आहे.

First published on: 20-02-2015 at 12:07 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badalapur players successful performance in national sports games