आजी-माजी नगरसेवकांचा वरदहस्त असलेल्या बांधकामांना प्रशासनाचे अभय?
बदलापुरात गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईला गेल्या महिनाभरापासून सुरुवात झाली असली तरी या कारवाईत अनेक ठिकाणी दुजाभाव झाल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. आजी-माजी नगरसेवकांच्या आशीर्वादाने उभी राहिलेली काही बांधकामे जाणीवपूर्वक वाचवली जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिका क्षेत्रात अनेक दिवसांपासून पालिकेच्या जागेवर, विनापरवानगी अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभी राहात आहेत. झोपडय़ा, टपऱ्या, चाळी आणि छोटय़ा घरांची बांधणी तर अगदी राजरोसपणे सुरू आहे. त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सातत्याने केली जात आहे. बदलापूरच्या नगराध्यक्षांनी अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेण्याचे जाहीर केले. त्यानंतर कारवाई सुरूही झाली. मात्र आता या कारवाईवर आक्षेप घेतले जात आहेत. शहरातील अनेक बडय़ा राजकीय नेत्यांशी संबंधित असलेल्या बेकायदा हॉटेल्सवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहे. शहरातील सोनिवली भागातील काही चाळींनाही अभय देण्यात आले असल्याचे समोर आले आहे. या चाळींना काही माजी नगरसेवकांचा वरदहस्त लाभल्याची चर्चा आहे. अतिक्रमणविरोधी कारवाई करत असताना सुरुवातीला नागरिक रहायला न आलेल्या चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
त्यातही काही बांधकाम व्यावसायिकांच्या चाळींना अभय दिल्याची चर्चा आहे. काही ठिकाणी चाळीतील नागरिकांचा कारवाईला मोठा विरोध आहे. त्यामुळे अतिरिक्त पोलीस फौजफाटा आणि त्यातही महिला पोलिसांची अधिकची कुमक लागणार असल्याने कारवाई पुढे ढकलण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.
बाजारपेठेला प्राधान्य का नाही
बदलापूर शहराच्या रेल्वे स्थानकाच्या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी येथे नागरिकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते. रिक्षांचे बेकायदा थांबे, रस्त्याच्या बाजूला वाढलेले अनधिकृत फेरीवाले आणि भाजीवाले यामुळे सायंकाळच्या वेळी नागरिकांना रस्त्याने चालणेही अवघड होते. अशा वेळी रेल्वे स्थानकाबाहेरील बाजारपेठेतील अतिक्रमण हटवण्याकडे पालिका दुर्लक्ष का करते आहे, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
‘ते फोन कुणाचे?’
शहरात अतिक्रमण कारवाई करत असताना कारवाईस्थळी उपस्थित अभियंत्यांना अनेकदा ज्याचे बांधकाम तोडले जाते आहे, त्यांच्याकडून ‘एकदा साहेबांशी बोला..’ अशी विनंती करण्यात येत असल्याचे चित्र आहे. असे दूरध्वनी आले की कारवाई थांबवली जाते किंवा सौम्य केली जाते. त्यामुळे कारवाईत अडथळा आणणारे ‘ते फोन कुणाचे’ अशी चर्चा कारवाईच्या स्थळी रंगत असते.