उपसचिव मारहाण प्रकरण ताजे असतानाच कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या लेखाधिकाऱ्यांना कंत्राटदाराकडून झालेल्या धक्काबुक्की आणि शिवीगाळी विरोधात शुक्रवारी पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. त्यामुळे नागरिकांना पालिका आवारात प्रवेशही बंद करण्यात आला होता.
कुळगाव बदलापूर पालिकेचे लेखाधिकारी श्रीकांत मोरे गुरुवारी रात्री उशिरा पालिकेची रोकड बॅंकेत जमा करण्यासाठी जात असताना पालिकेच्या आवारातच त्यांची गाडी अडवून कंत्राटदार शिवा कलशेट्टी याने कंत्राटाच्या कामाचे बिल देत नसल्याचा जाब विचारत धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. मात्र त्यावेळी आपल्याकडे असे कोणतेही बिल नसल्याचे त्यांनी कलशेट्टी यांना सांगितले. याप्रकरणी शुक्रवारी पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारी वर्गाने आरोपी कंत्राटदाराला अटक होत नाही, तोपर्यंत कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे पालिका इमारतीत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र याचा नाहक त्रास भोगावा लागला. पालिका मुख्यालयात यावेळी नागरिकांना प्रवेशच नाकारण्यात येत होता. त्यात नक्की काय प्रकार झाला हे कळत नसल्याने नागरिकांत प्रचंड संताप पसरला होता. दुपारच्या सुमारास लेखाधिकारी मोरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना कारवाईचे आणि संरक्षण देण्याची मागणी करणारे पत्र दिले. तोपर्यंत पालिकेत कामबंद आंदोलन सुरूच होते.
याआधीही कंत्राटदारांकडून दोन अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या होत्या.