बदलापूर : बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे अधिकृतरित्या लोकार्पण सोमवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडले. या लोकार्पण सोहळ्यापूर्वी बदलापूर स्थानकाबाहेर महाविकास आघाडीतील पक्षांकडून काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्यात आली. होम प्लॅटफॉर्मचे काम अपूर्ण असूनही श्रेयवादासाठी घाई घाईत लोकार्पण केले जात असल्याचा आरोप यावेळी महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला. तर कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गासाठी भूसंपादनातील अडचणी सर्वोच्च प्राधान्य देऊन सोडविण्यात येतील. तसेच बदलापूरवासियांच्या सुविधा टप्प्याटप्प्यात पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात मनसेचे समर्थन कुणाला ? राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला

अनेक दशकांची मागणी असलेल्या बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे अधिकृत लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले. यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते. बदलापूरसह मध्य रेल्वेवरील प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू आहेत, असे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

हेही वाचा : ठाणे : सेंट्रल पार्कमुळे कोंडीचे नवे केंद्र कोलशेत

कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गातील भूसंपादनाच्या अडचणी सोडविल्या जातील. ८३६ कोटी रुपयांचा कल्याण-मुरबाड रेल्वेप्रकल्प मंजूर झाला आहे. कल्याण-बदलापूर दरम्यान रेल्वेमार्गासाठी १५०० कोटी रुपये दिले आहेत. यापुढील काळातही रेल्वे प्रवाशांच्या सुविधांसाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध केला जाईल, असे दानवे यांनी जाहीर केले. तर, बदलापूर ते वांगणी दरम्यान चामटोली स्थानकाला मंजुरी द्यावी, कल्याण-बदलापूर आणि कल्याण-कसारा दरम्यान रेल्वेमार्गातील भूसंपादनाचे अडथळे दूर करावेत, अंबरनाथ स्थानकापर्यंत धावणाऱ्या काही लोकल बदलापूरपर्यंत वाढवाव्यात, बदलापूरसाठी नियमित लोकल खंडीत करता नव्याने जादा लोकल सुरू करावी अशा मागण्या यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केल्या. या वेळी भाजपाचे आमदार किसन कथोरे, मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक शशीभूषण आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा : आमदार गणपत गायकवाड भाजपचे असते तर एवढे निर्घृण वागले नसते, शहरप्रमुख महेश गायकवाड यांची टीका

महाविकास आघाडीची निदर्शने

लोकार्पण सोहळ्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या वतीने स्थानकाबाहेर काळे झेंडे दाखवत निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) शैलेश वडनेरे, काँग्रेसचे संजय जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तर लोकार्पण होण्यापूर्वीच या अपूर्ण फलाटाचा वापर प्रवाशांकडून केला जातो आहे. पाच वर्षांपूर्वी याचे भूमिपूजन करण्यात आले होते. फलाटावर अजुनही बहुतांश भाग छप्पराशिवाय आहे. मात्र होम प्लॅटफॉर्म पूर्ण झाल्याचा भाजपचा दावा आहे. तर सोहळा होत असताना फलाट क्रमांक एकवर प्रवाशांची गर्दी झाल्याने गोंधळ उडाला होता. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय रेल्वे अभियंता समन्वय या एक्स खात्यावरून दिलेल्या माहितीनुसार बदलापूर स्थानकात डेक आणि होम प्लॅटफॉर्मवर छप्पराचे काम सुरू आहे. हे काम या वर्षाच्या जून अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur railway station home platform inauguration by raosaheb danve mahavikas aghadi agitation css
First published on: 27-02-2024 at 10:50 IST