कुळगाव-बदलापूर महापालिकेचा आंधळा कारभार उघड
मालमत्ता कर भरूनही पुन्हा नव्याने मालमत्ता कराच्या पावत्या घरी पोहोचल्याने सध्या बदलापूरकर त्रस्त झाले आहेत. शहरातील जवळपास प्रत्येक विभागात असे प्रकार घडले असून भरणा केलेल्या कराच्या पावत्या घेऊन नगरपालिका कार्यालयात बदलापूरकरांना जोडे झिजवावे लागत आहेत. बदलापुरातील मोहपाडा या आदिवासी पाडय़ातील आदिवासींनाही आठ ते पंधरा हजारांपर्यंत मालमत्ता कराच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या दुबार मालमत्ता कराच्या बोजाने बदलापूरकर त्रस्त झाले आहेत.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या कर आकारणी आणि वसुली विभागातर्फे काही नागरिकांना तब्बल तीन ते चार वर्षांचे कर आकारणी पावती पाठवण्यात आली आहे. काही नागरिकांना ऑगस्ट महिन्यात मालमत्ता कराच्या पावत्या वितरित करण्यात आल्या. त्यानंतर डिसेंबपर्यंत अनेक नागरिकांनी कराचा भरणा केला. या पावत्यांवरही आर्थिक वर्ष २०१५-१६ असे नमूद करण्यात आले होते. मात्र तरीही २३ मार्च रोजी पुन्हा नव्याने काही नागरिकांना मालमत्ता कराची बिले पाठविण्यात आल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. नव्याने पाठविण्यात आलेल्या बिलांमध्ये गेल्या वर्षीच्या शिल्लक आणि दंड आकारणी करण्यात आल्याने नागरिक त्रासून गेले आहेत. नियमितपणे भरणारा करण्यात येणाऱ्या कराच्या रकमेपेक्षा पाच ते सहा पट कर आकारण्यात आला आहे. त्यामुळे नियमितपणे कर भरूनही नव्याने आलेली पावती कशाची तसेच दरवर्षी कर भरूनही अतिरिक्त बाकी कशी, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान काही नव्या गृहसंकुलांना गेल्या तीन ते चार वर्षांचा कर एकदाच आकारला गेल्याने एवढा कर भरायचा कसा, असा प्रश्न आता नागरिकांसमोर आहे.
याबाबत कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे अधिकारी भाऊ निपुर्ते यांना विचारले असता, अशा प्रकारची तक्रार आमच्यापर्यंत पोहचलेली नाही, असा खुलासा त्यांनी केला. या विषयाची माहिती घेऊन चौकशी केली जाईल. तसेच ज्यांना एकदाच मोठी रक्कम भरता येणे शक्य नाही, अशांसाठी त्यांनी विनंती केल्यास त्यांना हफ्त्याने भरण्याची मुभा देण्यात येईल, अशी माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदिवासींना भरमसाट बिले
बदलापुरातील आदिवासीपाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहपाडय़ातील राजू वाघ यांना ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा मालमत्ता कराचे बिल पाठविण्यात आले होते. त्याचा भरणा वाघ यांनी डिसेंबर महिन्यात केला. मात्र मार्च महिन्याच्या शेवटी त्यांना पुन्हा मालमत्ता कराचे नवे बिल पाठविण्यात आले. त्यात २३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. अशा प्रकारे तब्बल चार हजार रुपयांचा कर आकारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मोहपाडय़ातीलच चंदर केवारी यांना तब्बल आठ हजार मालमत्ता कराचे बिल आल्याने त्यांनाही धक्का बसला आहे. आमच्या महिन्याच्या उत्तपन्नाइतके जर कर आकारले जाऊ लागले तर आम्ही जगायचे कसे, असा सवाल राजू वाघ यांनी उपस्थित केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badlapur resident get property tax bill after making payment
First published on: 27-04-2016 at 04:48 IST