नववर्षांच्या स्वागतासाठी बदलापूरवासीय आतापासूनच तयारीला लागले असून यंदा गुढीपाडवा व नववर्षांच्या निमित्ताने आठवडाभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यंदा प्रथमच बदलापूरला स्वत:च्या शहरातील ढोल पथकाचा नाद घुमताना ऐकायला मिळेल. नववर्ष स्वागतयात्रा समिती व मारुती मंदिर देवस्थान यांच्यातर्फे हौशी तरुणांना प्रोत्साहन म्हणून ‘गर्जा’ हे ढोल पथक तयार करण्यात आले आहे.
पन्नास जणांच्या या पथकात अठरा ते वीस महिलांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे बदलापूर शहरातले पहिले ढोलताशा पथक हे या शोभायात्रेचे आकर्षण ठरणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील विविध भागांतून सहा उपयात्रा निघणार असून या उपयात्रांमध्ये त्यांचे वेगवेगळे देखावे व चित्ररथ हेदेखील आकर्षण असणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली. नववर्षांच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्यात ‘स्वरानंद’ हा हिंदी गीतांचा कार्यक्रम, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांची व्याख्यानमाला, महिलांसाठी मेहंदी स्पर्धा, शहरातील सर्व भजनी मंडळांचा कार्यक्रम व कीर्तन जुगलबंदी अशा कार्यक्रमांचा समावेश आहे.  

मारुती देवस्थान व नववर्ष स्वागतयात्रा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गेली बारा वर्षे हा गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रेचा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत. यंदा ढोल पथक व सप्ताहभर सांस्कृतिक कार्यक्रम हे या वर्षीच्या यात्रेचे वैशिष्टय़ असणार आहे. महिलांचा या यात्रेत विशेष सहभाग असून संस्कार भारतीतर्फे चौकाचौकांत त्या रांगोळ्या काढणार आहेत.
– तुषार आपटे, आयोजक, नववर्ष स्वागतयात्रा समिती