बदलापुरात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी व तरुणींनी बाइक रॅली काढत आगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला.
या वेळी उत्स्फूर्तपणे बाइक रॅली काढत महिला सबलीकरणाचा संदेश त्यांनी दिला. येथील काका गोळे फाऊंडेशन येथून निघालेल्या या बाइक रॅलीत ८० महिला व तरुणींनी सहभाग नोंदवला. शिवाजी महाराजांवरील पोवाडा गाऊन ढोल-ताशा पथकाच्या साथीने या रॅलीला सुरुवात झाली. बदलापूर पूर्व भागात फिरून अखिल अपार्टमेंट येथे या रॅलीचा समारोप झाला.
या वेळी येथील कुळगाव सोसायटीतील नागरिकांनी रॅलीतील सहभागी महिलांचा गौरव केला, अशी माहिती रॅलीच्या आयोजक दीपाली कुलकर्णी यांनी दिली. या वेळी त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन महिला पोलिसांचा तुळशीचे रोपटे देऊन त्यांच्या सेवेबद्दल गौरव केला.
यापुढेही असे अनेक कार्यक्रम साजरे करणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.