ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय
ठाणे : महापालिका लसीकरण केंद्रांवर काही लोकप्रतिनिधी जाहिरातबाजी करून ही केंद्रे आपणच सुरू केल्याचे भासवत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे येऊ लागल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अशा राजकीय जाहिरातबाजीला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबरोबरच लसीकरण केंद्रावरील अशा जाहिराती काढून टाकण्याचे आदेश त्यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत.
ठाणे महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लसीकरण मोहिमेत लोकप्रतिनिधींना सहभागी होऊन सहकार्य करण्याची विनंती प्रशासनाने केली होती. त्यास लोकप्रतिनिधींनी प्रतिसाद दिल्याने लसीकरणामध्ये वाढ झाली आहे. परंतु काही लोकप्रतिनिधींच्या जाहिरातबाजीमुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. शहराच्या विविध भागात महापालिकेची लसीकरण केंद्रे आहेत. या सर्व केंद्रावर महापालिका लसपुरवठा करते आणि याठिकाणी पालिकेचे डॉक्टर, कर्मचारी उपस्थित असतात. असे असतानाही काही लोकप्रतिनिधी ही केंद्रे आपणच सुरू केल्याचे आणि आपल्याच पक्षाच्या माध्यमातून ही लस दिली जात असल्याचे भासवत आहेत. यासाठी लसीकरण केंद्राबाहेर हे लोकप्रतिनिधी फलक, होर्डिंग्ज आणि बॅनर लावत आहेत. या जाहिरातबाजीवरून केंद्रांवर वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचेही प्रकार समोर आले आहे. याविरोधात महापालिकेकडे तक्रारी येऊ लागल्या आहेत. या तक्रारीची गंभीर दखल महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी घेतली आहे. अशी जाहिरातबाजी सुरू असल्याचे निदर्शनास आले तर अशा जाहिराती काढून टाकाव्यात, असे आदेश त्यांनी सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत.