विश्वचषकाचा ज्वर सगळीकडे संचारला असून या विश्वचषकातील खेळाडूंच्या बॅटमधून बरसणारा धावांचा पाऊस क्रीडाप्रेमींचे पुरते मनोरंजन करीत आहे. देशातील क्रिकेटप्रेमावर उपजीविका असणारा असाच एक समाज ठाण्यातील कळवा परिसरात राहत असून लाकडी क्रिकेट बॅट, स्टम्प्स यांच्यासह लाकडी साहित्याची निर्मिती करून त्यातून येणाऱ्या पैशांवर त्यांच्या कुटुंबाची गुजराण होते. गुजरात, राजस्थान भागातून स्थलांतरित झालेल्या थोरी समाजातील कुटुंबांनी कळव्यातील पारसिकनगर येथे २५ वर्षांपूर्वी वास्तव्य सुरू केले आहे. स्थानिक भागातील लाकडांचा वापर करून हलक्या दर्जाच्या (ब्रॅण्डेड नाहीत) बॅटची निर्मिती केली जात असून याला लहान मुलांकडून मोठी मागणी आहे. या बॅट अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न ही मंडळी करीत असून ब्रॅण्डेड कंपन्यांचे स्टिकर्स, खेळाडूंचे चित्र या बॅटवर चिकटवून त्यांना अधिक देखणे करण्याचा प्रयत्न केला जातो. १८ इंचापासून ३३ इंचांपर्यंतच्या बॅट्स इथे मिळत आहेत. या साध्या बॅट्स २०० ते ३०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, तर स्ट्रोक असलेल्या बॅट्स ४०० ते ५०० रुपयांपर्यंत मिळतात.