बाकांवर गर्दुल्ल्यांनी ठिय्या दिल्याने उभे राहूनच गाडीची प्रतीक्षा

कल्याण रेल्वे स्थानकात सध्या भिकाऱ्यांचा सुळसुळाट झाला आहे. उपनगरी गाडय़ांबरोबरच देशाच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ा कल्याणमधून सुटत असल्याने इथे कायम प्रवाशांची वर्दळ असते. मात्र स्थानकावरील बहुतेक बाकडय़ांवर चक्क भिकारी बसलेले असल्याने प्रवाशांना उभे राहून गाडीची वाट पाहावी लागते.

मध्य रेल्वेवरील कल्याण रेल्वे स्थानक सर्वाधिक वर्दळीचे म्हणून ओळखले जाते. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक ते तामिळनाडू अशा सर्व राज्यांमध्ये जाण्यासाठी येथून मेल, एक्स्प्रेस मिळतात. दिवसाला दीडशेहून अधिक मेल एक्स्प्रेस येथून ये-जा करत असतात. त्यामुळे कल्याण ते कर्जत आणि कसाऱ्यापर्यंत तसेच ठाण्यापासूनचे प्रवासी मेल एक्स्प्रेस पकडण्यासाठी कल्याण स्थानकात येत असतात. त्यामुळे कल्याण स्थानकात प्रवाशांचा अहोरात्र राबता असतो. अनेकदा रेल्वे उशिराने धावत असल्यास प्रवाशांच्या सुविधेसाठी येथे प्रतीक्षालय आणि फलाटांवर आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र बहुतेक रेल्वे फलाटांवरील आसनांवर भिकारी, गर्दुल्ले यांचाच कब्जा असल्याचे पाहायले मिळते आहे. फलाट क्रमांक चार ते सात या फलाटांवरून मेल एक्स्प्रेस गाडय़ा सुटतात. याच फलाटांवर अधिक गर्दी असते. मात्र याच फलाटांवर या भिकारी आणि गर्दुल्ल्यांचा वावर अधिक असल्याचेही पाहायला मिळते.

रेल्वेतर्फे बनवण्यात आलेल्या दगडी आसनांवर तर अनेकदा हे भिकारी झोपलेले असतात. त्यामुळे प्रवाशांना उरलेल्या जागेत अडचणीत बसावे लागते. त्यात अस्वच्छ आणि दरुगधीमुळे त्या आसनावर नंतरही बसता येत नाही. त्याचप्रमाणे बहुतेक फलाटांवरील खांबाखाली, मोकळ्या जागेत हे गर्दुल्ले, भिकारी झोपलेले असल्याने प्रवाशांना इथून कुटुंबाला घेऊन जाणेही अशक्य होते. अनेकदा हे भिकारी विचित्र अवस्थेत बसलेले किंवा झोपलेले असतात. लहान मुले आणि महिलांना त्यांची भीती वाटते.

चोरीच्याही घटना

दिवाळीला बाहेरगावी गेलेले लोक आता मुंबईकडे परतत आहेत. त्यामुळे दररोजच्या या गर्दीत अधिकची भर पडली आहे. त्यात ऐन गर्दीच्या वेळी स्थानकात उभे राहण्यास जागा नसते. त्यात या भिकाऱ्यांच्या वावराने प्रवाशांच्या संतापात भर पडते आहे. त्यामुळे या भिकाऱ्यांचा स्थानकावरील वावर कमी करावा अशी मागणी आता प्रवाशांकडून होते आहे. याच भिकारी, गर्दुल्ल्यांकडून स्थानकातील प्रवाशांच्या मौल्यवान वस्तूंची चोरीही केली जाते. त्यामुळे हे गर्दुल्ले व भिकाऱ्यांना हद्दपार केल्यास स्थानकातील चोऱ्या कमी होतील, असे मत अनेक प्रवासी व्यक्त करतात.