ठाणे : भिवंडीत भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाची आणि त्याच्या चुलत भावाची कार्यालयात शिरुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात १२ संशयितांविरोधात गुन्हे दाखल असून पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पूर्व वैमन्यस्यातून किंवा राजकीय वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाली आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

भिवंडीत भाजपचे पदाधिकारी प्रफुल्ल तांगडी हे युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. गावातील तसेच त्या भागातील काही तरुणांसोबत त्यांचे वाद असल्याचे तपासात समोर आले असून त्याच्या चुलत भावाने दिलेल्या तक्रारीनंतर १२ संशयितांविरोधात गन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, प्रफुल्ल यांच्या हत्येचे वृत्त पसरताच भाजपचे भिवंडी पश्चिम मतदारसंघाचे आमदार महेश चौघुले, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रफुल्ल यांच्या नातेवाईकांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या दुहेरी हत्याकांडानंतर भिवंडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भिवंडी तालुक्यातील पायेगाव येथील खार्डी या गावात प्रफुल्ल तांगडी हे त्यांच्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होते. त्यांचा जे.डी.टी. या नावाने रियल इस्टेटचा व्यवसाय होता. सोमवारी रात्री ११ रात्री प्रफुल्ल आणि तेजस हे कार्यालयात असताना, दोनजण चेहऱ्याला रुमाल बांधून त्यांच्या कार्यालयाजवळ आले. त्यांनी प्रफुल्ल आणि तेजस यांच्यासोबत वाद घालून त्यांच्यावर तलवारी, सुऱ्याने वार करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांनी तेजस यांच्यावर देखील हल्ला केला. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. प्रफुल्ल आणि तेजस हे दोघेही कार्यालयाबाहेर जखमी अवस्थेत पडले होते. घटनेची माहिती प्रफुल्ल यांच्या नातेवाईकांना मिळताच, त्यांनी दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु डाॅक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.

हा हल्ला पूर्ववैमन्यस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा आरोप प्रफुल्ल यांच्या नातेवाईकांनी केला. भिवंडी तालुका पोलीस ठाण्याबाहेर प्रफुल्ल यांचे नातेवाईक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाण मांडला. तसेच आरोपींविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. प्रफुल्ल यांच्यावर यापूर्वी देखील हल्ल्याचा कट रचण्यात आला होता, असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला.प्रफुल्ल यांच्या चुलत भावाने तक्रार दाखल केल्यानंतर भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात पायेगाव येथील १२ संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.