या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिवंडी महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढविणार हे आता स्पष्ट होऊ लागले असून युतीसाठी चर्चेचे पोषक वातावरण तयार झाले नसल्याने दोन्ही पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाच जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्यामुळे शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्यता जवळपास धूसर मानली जात आहे.

भिवंडी महापालिकेची निवडणूक प्रभाग पद्घतीने होणार असून या निवडणुकीसाठी २३ प्रभागांची रचना करण्यात आली आहे. त्यापैकी २१ प्रभाग चार सदस्यांचे तर दोन प्रभाग तीन सदस्यांचे करण्यात आले असून या प्रभागांमधून एकूण ९० सदस्य महापालिकेत निवडूण जाणार आहेत. या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शहरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात शिवसेना-भाजप युती सत्तेवर असली तरी मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मात्र दोन्ही पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढविल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीबाबतच्या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भिवंडी महापालिकेत युती करण्यासाठी शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान ५० हून अधिक जागा देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने भाजपपुढे ठेवला आहे. मात्र, भाजपलाही जास्त जागा हव्या असल्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरू असल्याने युतीबाबत अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. एकीकडे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये युतीची बोलणी सुरू असली तरी दुसरीकडे मात्र दोन्ही पक्षांनी सर्वच जागांकरिता उमेदवारांच्या मुलाखती घेऊन स्वबळाची तयारी सुरू केली आहे.

शिवसेनेसोबत युती करण्यासंबंधी स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. मात्र, युतीबाबत वरिष्ठ पातळीवर अद्याप चर्चा झालेली नाही. आम्ही सर्वच जागांसाठी ३५० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून ही यादी प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात आली आहे.

खासदार कपिल पाटीलभाजपचे नेते

भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत युतीची चर्चा सुरू असून जागावाटपाचा तिढा कायम आहे. निवडणुकीत ९० पैकी ५० जागा देण्याचा प्रस्ताव भाजपला देण्यात आला होता. मात्र, भाजपकडूनही जास्त जागांची मागणी सुरू असल्यामुळे युतीचा निर्णय होऊ शकलेला नाही. सर्वच जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून युती झाली नाही तर शिवसेना स्वबळावर लढेल.

सुभाष माने, शिवसेनेचे शहरप्रमुख

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhiwandi municipal corporation election 2017 shiv sena bjp alliance
First published on: 04-05-2017 at 01:34 IST