भिवंडी महापालिकेकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई

ठाणे : जिलानी इमारत दुर्घटनेनंतर खडबडून जाग आलेल्या भिवंडी-निजामपूर महापालिका प्रशासनाने आता शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास सुरुवात केली आहे. अनेक भागांमध्ये प्रशासनाला लोकांचे सहकार्य मिळत नसल्यामुळे या इमारतींचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. मंगळवारी जिलानी इमारतीच्या शेजारी असलेल्या तीन अतिधोकादायक इमारतीचा वीजपुरवठा खंडित करून त्या रिकाम्या करण्यात आल्या.

जिलानी इमारत दुर्घटनेत अनेकांचे बळी गेले. आणखी काही नागरिक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. ढिगारा उपसण्याचे काम मंगळवारी रात्रीपर्यंत सुरू होते. या घटनेनंतर भिवंडी महापालिका प्रशासनाने आता शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेऊन त्या रिकाम्या करण्याची कारवाई सुरू केली आहे. अनेकजण जागेच्या वादातून इमारतीतील घर सोडण्यास नकार देतात आणि तिथेच जीव मुठीत घेऊन राहतात. त्यामुळे या रहिवाशांना इमारतीतून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने संबंधित इमारतींचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीशेजारीच असलेल्या तीन धोकादायक इमारतींमध्ये पालिकेने अशाच प्रकारची कारवाई केली आहे. त्यामध्ये सिद्धीक पटेल ही तीन मजली इमारत, रशीद खान ही तीन मजली इमारत आणि रफिक चौहान ही दुमजली इमारतीचा समावेश आहे. या तीन इमारती अतिधोकादायक झाल्या होत्या. या इमारतींच्या रहिवाशांना वारंवार नोटिसा देऊनही ते इमारत रिकामी करण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे पालिकेने पोलिसांच्या मदतीने मंगळवारी या इमारती रिकाम्या केल्या. या नागरिकांना शेजारच्या मदरशामध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील इमारतींकडे विशेष लक्ष

भिवंडी महापालिकेची स्थापना २००२ मध्ये झाली असून या वेळी शहराच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या अनेक गावांना महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यापूर्वीच शहराच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये अनेक इमारती उभ्या राहिल्या होत्या. ग्रामपंचायत हद्दीत असल्यामुळे या इमारतींच्या बांधकामांच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह आहे. सोमवारी कोसळलेली जिलानी ही इमारत जुन्या ग्रामपंचायत हद्दीमध्येच उभारण्यात आली होती. या घटनेनंतर चौकशी समितीतर्फे पूर्वीच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये उभारण्यात आलेल्या अशा जुन्या इमारतींवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

दोन महिन्यांपूर्वीच भिवंडी शहरातील २५ अतिधोकादायक इमारती आणि ७२ धोकादायक इमारती महापालिकेने रिकाम्या करून घेतल्या आहेत. यापुढेही धोकादायक इमारतींविरोधात महापालिकेची कारवाई सुरूच राहणार आहे.

– ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका