व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून ७० गृहउद्योजिका एकत्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भगवान मंडलिक, लोकसत्ता

डोंबिवली : तीन महिन्यांतील टाळेबंदीच्या काळात दुकान, उपाहारगृहांसह सर्व प्रकारच्या बाजारपेठा बंद होत्या. या कालावधीत डोंबिवलीजवळील कल्याण-शिळफाटा रस्त्याजवळील १२ इमारतींचा समूह असलेल्या रिजन्सी गृहसंकुलातील ७० हून अधिक गृहउद्योजिका व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून एकत्रित आल्या.

कोणाच्या घरात कोण महिला कोणता गृहउद्योग करते, अशी चर्चा करताना ७० हून अधिक महिला घरगुती पद्धतीने विविध प्रकारचे सुक्ष्म उद्योग करीत असल्याचे समोर आले. यापूर्वी व्यक्तिगत स्वरूपात असलेला त्यांचा लघुउद्योग आता एका व्यासपीठावर बाजारपेठसारखा आकाराला आला आहे. संकुलातील सहा हजार रहिवाशांसाठी एक मोठी बाजारपेठ संकुलाच्या आवारातच उभी राहिली आहे.

सकाळ, संध्याकाळ कोणी तयार करून देऊ शकेल का, तयार केक संकुलात कोणी तयार करतेय का, कपडे कोणी शिवून देतेय का अशी विचारणा होऊ लागली. मागील तीन महिन्यांत या गटाच्या माध्यमातून झालेल्या चर्चेतून रिजन्सीमध्ये ७० हून अधिक महिला घरगुती गृहउद्योग करीत असल्याचे दिसले. याशिवाय अनेक महिला माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, सनदी लेखापाल, एलआयसी सेवक व इतर आर्थिक गुंतवणुकीच्या सल्लागार आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रिजन्सी संकुलात घरगुती उद्योग करणाऱ्या महिला असल्याने त्यांचा एक गट समूह तयार केला तर एक मोठी बाजारपेठ संकुलाच्या आवारात उभी राहील. येथील सुमारे सहा हजार रहिवाशांना त्याचा लाभ होईल. याशिवाय संकुलातील उद्योजिकांना स्थानिक पातळीवर वस्तू विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध होईल. या विचारातून स्टेट बँकेतून वरिष्ठ अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या उषा मजेठिया यांनी पुढाकार घेतला. प्रत्येक गृहउद्योजिकेशी संपर्क केला. आपण संकुलात तयार करत असलेल्या वस्तूंना आपणच संकुलात किंवा गरजेप्रमाणे बाहेर बाजारपेठ उपलब्ध करून दिली तर गृहउद्योजिकांना व्यवसाय वाढ करण्यास वाव मिळेल. महिला बचत गटासारखा एक गट तयार केला तर शासन सहकार्यातून हे काम आणखी वाढविता येईल. प्रत्येक महिलेला आपली व्यवसायवृद्धी करता येईल, असा सल्ला दिला. त्याला सर्व महिला उद्योजिकांनी मान्यता दिली. या महिलांच्या कागदोपत्री संकलनाचे काम प्रा. त्रृशाली खानविलकर यांनी पूर्ण केले आहे.

येथील उद्योजक महिलांकडून तयार करण्यात येणाऱ्या वस्तूंची विक्री संकुलात, डोंबिवली शहरातील रहिवाशांकडून सुरू झाली आहे. सध्या रहिवाशांना उद्योजिकेच्या घरी जाऊन साहित्य खरेदी करावी लागते. काही घरपोच वस्तूंची सेवा देतात. हे साहित्य पुरविणारी गरजू महिलांची एखादी फळी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. टाळेबंदीने आत्मनिर्भरतेचा धडा शिकवला. त्याचा पुरेपूर उपयोग महिला उद्योजिकांनी करून घेतला आहे, असे या उपक्रमाच्या समन्वयक उषा मजेठिया यांनी सांगितले.

गृहउद्योगात तयार होणाऱ्या वस्तू

ज्वेलरी, हात सफाईची जंतुनाशक, अंतरवस्त्र, बिछान्यावरील चादर, मेजवानीची नोंदणी, नाष्टा, भोजनाची नोंदणी, आइसक्रीम, जुने कपडे शिऊन देणे, खासगी शिकवण्या, पौरोहित्य करणाऱ्या महिला, लहान मुलांची वस्त्र, दुपटी, मसाले, पीठ, केक, मासळी पदार्थ, सौंदर्यप्रसाधन, सेंद्रिय पदार्थ. याशिवाय सनदी लेखापाल, घर सौंदर्यीकरण करणारे अभिकल्पक, फलक तयार करणारे आरेखनकार, कायदेशीर सल्लागार, व्यवस्थापन, आरोग्यविषयक मार्गदर्शक यांची फळी गटात सक्रिय आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big market in the regency complex in dombivli zws
First published on: 08-07-2020 at 01:14 IST