भरधाव दुचाकी चालवणे, शर्यती, कसरतींचे प्रकार; वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावल्याने धुमाकूळ सुरू
निसर्गरम्य आणि शांत परिसर म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील उपवन तलाव परिसरातील बेपर्वा दुचाकीस्वारांचा उपद्रव पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. भरधाव दुचाकी चालविणे आणि दुचाकीवर अचाट कसरती करणे, असा उद्योग दुचाकीस्वारांकडून सुरू झाल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. याआधी ‘लोकसत्ता ठाणे’मधून वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी या परिसरातील गस्त वाढवली होती. मात्र, गस्त शिथिल होताच बाइकस्वारांनी पुन्हा धुमाकूळ सुरू केला आहे.
येऊर जंगलाच्या पायथ्याशी असलेल्या शांततामय तसेच निसर्गरम्य उपवन तलाव परिसरात अनेक जण फेरफटका मारण्यासाठी येत असतात. या भागातील रस्त्यांवरही वाहनांची फारशी वर्दळ नसते. नेमके हेच हेरून दुचाकीस्वारांनी तलाव परिसराला अड्डा बनवत त्या ठिकाणी दुचाकीवरून अचाट कसरती सुरू केल्या आहेत. या दुचाकींमुळे परिसरात किरकोळ अपघाताच्या घटनाही घडल्यामुळे नागरिकांना तलाव परिसरात फेरफटका मारताना असुरक्षित वाटू लागले होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी उपवन परिसरात विशेष मोहीम हाती घेऊन दुचाकीस्वारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती. अशा दुचाकीस्वारांबाबत तक्रारी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकही उपलब्ध करून दिला होता. मात्र, वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात आधीच पोलिसांची संख्या अपुरी असल्यामुळे या भागात कायमस्वरूपी नाकाबंदी करणे शक्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांची पाठ फिरताच दुचाकीस्वारांनी पुन्हा एकदा उपद्रव सुरू केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.