कल्याण अंबरनाथ मॅन्यूफॅक्टर्स असोसिएशनचा पुढाकार

डोंबिवली : डोंबिवली परिसरातील जल प्रदूषण कमी करण्यासाठी कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने (कामा) बायोनेस्ट पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यावर जैव विरजणाची (बायो कल्चर) प्रक्रिया केली जाते. रासायनिक पाण्यातील सर्व रासायनिक घटक नष्ट झाल्यानंतर हे पाणी साठवण टाकीत जमा करून त्याचा पुनर्वापर केला जात आहे. औद्योगिक क्षेत्रातील जल प्रदूषण कमी करण्यासाठी कामाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, अशी माहिती ‘कामा’ संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली.

एमआयडीसीतील सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात (सीईटीपी) हा भूमिगत प्रकल्प उभारण्यात आला आहे. दहा हजार लिटर रासायनिक सांडपाण्यावर दररोज या प्रकल्पात प्रक्रिया केली जाते. कंपन्यांमधून सोडण्यात येणारे पाणी प्रक्रियेसाठी सामायिक सांडपाणी प्रक्रिया (सीईटीपी) केंद्रात येते. तेथे तीन तळ टाक्या उभारण्यात आल्या आहेत. पहिल्या टाकीत गाळण बसविण्यात आली आहे. तेथे रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया व इतर घटक यांच्यावर प्रक्रिया केली जाते. हे प्रक्रिया केलेले पाणी दुसऱ्या टाकीत सोडले जाते. तेथे जैव विरजण टाकून पाण्याची घुसळण केली जाते. गंधहीन आणि रंगहीन पाणी या टाकीत तयार केले जाते. हे पाणी प्रक्रियेनंतर मूळ पाण्यासारखे तयार होते. या पाण्यात कोणतेही रासायनिक घटक नसल्याने ते पुनर्वापरासाठी साठवण टाकीत जमा केले जाते.

हे पाणी ‘सीईटीपी’ आवारातील बगीचा, झाडांना दिले जाते. प्रक्रियायुक्त चोथा झालेली मळी झाडांच्या बुडाशी टाकली जाते. ही मळी यापूर्वी तळोजा येथे नेली जात होती. तो खर्च या प्रकल्पामुळे वाचला आहे. या नवीन प्रकल्पामुळे जल प्रदूषणाची पातळी कमी होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष सोनी यांनी दिली. या तळ टाक्यांच्या वरती मातीचा भराव टाकून त्यावर विविध प्रकारच्या झाडांची रोपे लावण्यात आली आहेत. तळ टाक्यातून तयार होणारी पाण्याची वाफ टाक्यांवरील मातीला लागून झाडांना नैसर्गिक ओलावा मिळत आहे. सततचा गारवा आणि ओलाव्यामुळे येथील झाडे तरारून वर आली आहेत. या प्रकल्पातून वीज तयार करण्याचे नियोजन केले आहे, असे ते म्हणाले. हा प्रकल्प उभारणीसाठी अध्यक्ष सोनी, सचिव राजू बैलुर, माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी, उदय वालावलकर, आशीष भानुशाली, जयवंत सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.