महापालिका प्रशासन सतर्क; मृत पक्षी आढळल्यास माहिती देण्याचे आवाहन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता प्रतिनिधी

विरार : करोनानंतर नव वर्षांत उभे राहिलेले नवे संकट ‘बर्ड फ्लू’ ने पुन्हा एकदा नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पालिकेने खबरदार राहण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. या रोगाचा प्रसार हा पक्ष्यांच्या मार्फत होत असल्याने पालिकेने आता शहरातील सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची तपसणी करणार आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाची मदत घेतली जाणार आहे.

वसईच्या लगत असलेल्या ठाणे परिसरात बर्ड फ्लू संदर्भातील घटना समोर आल्याने वसई-विरार महापालिकेने अधिक खबदारी घेणे सुरू केले आहे. नुकतेच पालिकेने प्रसिद्धी पत्रक जाहीर करून नागरिकांना आवाहन केले आहे की, राज्यात अनेक जिल्ह्यंतील पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लू या आजाराचा विषाणू आढळल्याच्या पाश्र्वभूमीवर  वसई-विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलली आहेत.

त्या दृष्टीने प्रशासनाकडून पुढीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये कोंबडय़ा, कावळा, कबूतर किंवा इतर पक्षी मृत अवस्थेत आढळल्यास त्याची माहिती त्वरित महानगरपालिका आपत्कालीन विभाग शीघ्र कृती दल मदतकक्ष क्र. ०२५०-२३३४५४६, ०२५०-२३३४५४७ वर कळविण्यात यावी. महानगरपालिकेकडे प्राप्त माहितीनुसार सदर मृत पक्ष्यांची योग्यरीतीने विल्हेवाट लावण्याची कार्यवाही महानगरपालिकेमार्फत करण्यात येईल. नागरिकांनी आजारी पक्षी यांच्याबरोबरचा संपर्क टाळावा. संसर्गापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत. मांस व अंडी व्यवस्थित शिजवून खावीत. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात ‘बर्ड फ्लू’ सदृश्य आजाराचा रुग्ण आढळल्यास रुग्ण भरती करण्याकरिता महानगरपालिकेने विलगीकरण कक्ष स्थापन केलेला आहे. तसेच शहरातील मांस/मटण दुकानांचे सर्वेक्षण करून त्यांना दुकानांची स्वच्छता राखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याच बरोबर पालिका गृहसंकुलात पाळीव प्राणी, पक्षी यांचेसुद्धा सर्वेक्षण करणार आहे, तसेच या प्राण्यांची/ पक्षांची आरोग्य तपासणी करणार आहे. यासाठी तालुका पशु संवर्धन विभागाची मदत घेणार असल्याचे महापलिका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी सांगितले आहे. सध्या तालुक्यात एकही प्रकरण बर्ड फ्लू चे सापडले नाही यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याचे कोणतेही कारण नाही असेही त्या म्हणाल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird flu all pets checkup drive dd70
First published on: 15-01-2021 at 00:03 IST