पक्ष्यांचे वेगळेपण हे त्यांच्या पंखात आणि त्यावरील पिसांत आहे. पिसे ही रंगबिरंगी, आकर्षक, कधी कधी खूपच झगमगीत असतात. त्यांचा खरा उपयोग पक्ष्यांना ऊब देणे हा असतो. तसेच या पिसांच्या आवरणामुळे पक्ष्यांच्या शरीराला ओरखडे उठणे वगैरे सारख्या त्रासापासून दूर ठेवता येते. पक्ष्यांच्या अंगाला लागून जी पिसे असतात ती मऊशार, मुलायम असतात. त्यामानाने शेपटीवरची आणि पंखांवरची पिसे मजबूत असतात. वरची पिसे उड्डाण करायला मदत करतात. म्हणून त्यांना उड्डाण पिसे म्हणतात.
उड्डाण पिसे ही झाडाच्या पानांसारखी असतात. पानासारखी मधून जाणारी शीर, पुढे देठ, मधल्या शिरेच्या दोन्ही बाजूला उपशाखा शिरांचे जाळे (व्हेनेशन), प्रत्येक व्हेनच्या टोकाला एक हुक असतो. हे हुक एकमेकांत गुंतलेले असतात. त्यांचा उपयोग पिसे एकसंध ठेवायला होतो. चांगल्या पिसांशिवाय आणि चांगल्या पंखांशिवाय पक्षी हा अपंग म्हणावा लागेल. अन्न मिळवण्यासाठी, घर बांधण्यासाठी, पिलांना खाऊ आणण्यासाठी, प्रियाराधन करताना, स्थानांतर करताना चांगल्या पंखांची आणि चांगल्या उड्डाणाची गरज असते. म्हणून तर पक्षी आपल्या पिसांची आणि पंखांची सतत काळजी घेताना दिसतात. आपल्या चोची आपल्या पिसांत खुपसून ती खाजवून साफ करताना आपण पक्ष्यांना बऱ्याच वेळा पाहतो. कधी कधी काही पिसांपर्यंत चोच पोहोचत नाही, तेव्हा पंख पसरून पाय वर करून, पायाच्या बोटांनी ते पीस खाजवून साफ करताना दिसतात. अशा प्रकारे पंख खाजवले की पिसांतील बांडगुळासारखे वाढणारे परजीव म्हणजे उवा, लिखा, गोचीड खाली पडतात आणि पिसे साफ होतात.
चिमणी, वेडा राघू, धनेश असे काही पक्षी आहेत, जे अंधाऱ्या किंवा बंदिस्त घरात राहतात. अशा अंधारात घरटे असणाऱ्या पक्ष्यांच्या शरीरात परजीव घुसण्याचा धोका जास्त असतो. असे पक्षी धुळीत आंघोळ करतात. तापलेल्या आणि तापून सैल झालेल्या मातीत ते आपले अंग दाबून बुडवतात, त्या तापलेल्या मातीत एक वाटी तयार करतात आणि पंख घुसळतात, गरम धूळ अंगभर घेतात. जॅकडॉ नावाचा काश्मीरमध्ये दिसणारा, पांढऱ्या डोळ्याचा कावळा तर गिरणीच्या चिमणीतून येणाऱ्या गरम धुरात आंघोळ करतो, जेथे गरम धूळ उपलब्ध नाही तेथे गरम धूर उपयोगी येतो. एप्रिल महिना आला की उलटे स्थलांतर चालू होते. विणीच्या ओढीने पक्षी आपापल्या मायदेशी परतण्यासाठी उत्सुक असतात आणि आता त्यांच्यात बदल होऊ लागतात. बऱ्याच पक्ष्यांचे रंग जास्त चमकदार होतात. ‘सी-गल’सारखे काही पक्षी आहेत त्यांच्या काळ्या डोळ्यांना पांढरी रिंग येते, राखी बगळ्यासारख्या काही पक्ष्यांना शेंडीसारखी डोक्यावर पिसे येतात. पण या सर्वाहून निराळा आहे तो ‘कमलपक्षी’ (फेजंट टेल्ड जसाना) . विणीचा हंगाम सुरू झाला की याची भुंडी शेपटी वाढायला लागते. बघता बघता ती दीड फुटापर्यंत वाढते. बरे वाढतानाही सरळसोट न वाढता, शेतकऱ्याच्या विळ्याच्या पात्यासारखी बाक येऊन वळून खाली येते. पाण्यावर वाढलेल्या पाणवनस्पतीवरून, जाडपर्णीवरून, विशेषत: कमळाच्या पानांवरून हा पक्षी जमिनीवरून चालावे इतका सहज चालत जातो. बरे वजनालाही काही इतका हलकाफुलका नाही. सव्वाशे ग्रॅमचा नर आणि जवळजवळ त्याच्या दुप्पट वजनाची मादी. कमळाचे नाजूक पान हा भार कसा काय उचलून धरत असेल. पण त्याचे खरे गमक कमळाच्या पानात नाही, तर कमलपक्ष्याच्या पायात आहे. एक तर या कमलपक्ष्याचे पाय त्याच्या शरीराच्या मानाने उंच असतात. त्याला पुढे लांबसडक बोटे आणि त्या बोटांना सरळसोट नखे. या अलौकिक पायाच्या रचनेमुळे कमळाच्या पानांवरून चालताना याला पाहताना खूपच मजा येते.
मेधा कारखानीस
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2015 रोजी प्रकाशित
असे पाहुणे येती : कमलपक्ष्याची नजाकत
पक्ष्यांचे वेगळेपण हे त्यांच्या पंखात आणि त्यावरील पिसांत आहे. पिसे ही रंगबिरंगी, आकर्षक, कधी कधी खूपच झगमगीत असतात. त्यांचा खरा उपयोग पक्ष्यांना ऊब देणे हा असतो.
First published on: 01-04-2015 at 12:23 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bird migration