डोंबिवली ‘एमआयडीसी‘तील अनधिकृत बांधकाम तोडल्याने थयथयाट
डोंबिवली एमआयडीसीतील बेकायदा इमारत तोडण्यास गेलेल्या एमआयडीसीच्या अभियंत्याला भाजपचे नगरसेवक महेश पाटील व त्यांच्या समर्थकांनी बांधकाम तोडण्यास मज्जाव करून मारहाण केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही या मारहाणीचा फटका बसला. आज संध्याकाळी ही घटना घडली.
मानपाडा पोलिसांनी नगरसेवक पाटील यांच्यासह समर्थकांवर सरकारी कामात अडथळा, मारहाण करण्याचा गुन्हा दाखल केला.
एमआयडीसीच्या आरक्षित भूखंडावर काही भूमाफियांना बेकायदा इमारती बांधल्या आहेत. काही ठिकाणी गाळे, टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. ही बेकायदा बांधकामे तोडण्याची मोहीम एमआयडीसीने सुरू केली आहे. आज दुपारी एमआयडीसीचे अभियंता नितीन अंकुश अनधिकृत बांधकाम हटाव पथकासह एमआयडीसीतील सागर्ली भागातील बेकायदा बांधकामे तोडण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत मानपाडा पोलिसांचा बंदोबस्त होता.
महावितरण कार्यालयालगत असलेल्या मोकळ्या जागेवरील इमारत तोडण्यात आल्यानंतर संतप्त झालेल्या पाटील समर्थकांनी एमआयडीसीच्या अधिकारी, कामगारांना मारहाण
केली. या मारहाणीत हवालदार एस. बी. चोरे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू
आहेत.
पोलिसांची टाळाटाळ
कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी या प्रकरणाची माहिती देण्यास टाळाटाळ केली. मानपाडा पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता, तेथील महिला हवालदाराने या घटनेबाबत पूर्ण अनभिज्ञता दाखवून, असे काही घडलेले नाही असे सांगितले.