बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने शिवसेना आणि भाजपाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भाजपने सर्वाधिक म्हणजे जवळपास १८८ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत, अशी माहिती भाजपचे स्थानिक नेते राम पातकर यांनी दिली. या पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या अधिक असल्याने उमेदवारांची यादी अंतिम करताना बंडखोरी टाळण्याचे मोठे आव्हान या पक्षापुढे असणार आहे.
शिवसेनेनेदेखील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून त्यांच्याकडे केवळ ६० इच्छुकांनीच मुलाखती दिल्या आहेत. यातील विशेष बाब म्हणजे या दोन्ही पक्षांनी नगरपालिकेच्या सर्व ४७ जागांसाठी या मुलाखती घेतल्या आहेत. यातून हे दोन्ही पक्ष ही निवडणूक स्वतंत्र लढणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. परंतु सध्या केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार आल्याने भाजपकडून निवडणूक लढविण्यास अनेक जण इच्छुक आहेत.
तसेच प्रत्येक कार्यकर्त्यांला न्याय मिळावा अशी त्याची अपेक्षा आहे; परंतु, राष्ट्रवादीतून भाजपत आलेले आमदार किसन कथोरे यांच्यासोबत आलेले पाच नगरसेवक तसेच मनसेचा एक नगरसेवक यांना निवडणुकीत उमेदवारी देण्याचे ठरले असल्याचे सांगितले जाते.
त्यामुळे आधीच उत्साह वाढलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर या प्रभागात अन्याय होणार आहे. एकंदर इच्छुकांचा आकडा पाहता भाजपत बंडखोरी होण्याचीदेखील शक्यता अधिक आहे. दरम्यान, दोन्ही शहरांमध्ये गुढीपाडव्याला मोठय़ा संख्येने स्वागतयात्रा आणि उपयात्रा काढण्यात आल्या. या वेळी आमदारांपासून नगरसेवक ते पक्ष पदाधिकारी पातळीपर्यंतच्या सर्व उमेदवार यात सामील झाले होते. सर्वच राजकीय नेत्यांनी पक्षाची प्रतिमा मतदारांच्या मनावर कशी ठसेल, यावर भर दिला होता. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी स्वागतयात्रांमध्ये जास्तीतजास्त आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुलाखतींचा फार्स?
शिवसेना-भाजपने घेतलेल्या या मुलाखती म्हणजे फार्स ठरण्याची शक्यता आहे. शहरात बहुतांश ठिकाणी दोन्ही पक्षांच्या संभाव्य उमेदवारांनी आपापली पक्ष प्रचार कार्यालये उघडली आहेत. त्यामुळे अन्य इच्छुक कार्यकर्त्यांच्या मुलाखतींचा फार्स कशासाठी हाच प्रश्न या पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना शहरात विचारत आहेत.