नगरसेवक संजय वाघुले स्थायी समितीच्या सभापतीपदी
मुंबई महापालिकेत प्रभाग समितीअध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून शिवसेना-भाजप युती दुभंगली गेली असतानाच ठाणे महापालिकेत मात्र सत्ताधारी शिवसेनेने स्थायी समिती अखेर भाजपाला देऊ केली आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर शिवसेनेने सत्ता वाटपाच्या वेळी दिलेला शब्द पाळल्याने भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे. एकीकडे असे चित्र असतानाच दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीप्रणीत लोकशाही आघाडी असलेल्या काँग्रेसच्या दोन सदस्यांनी तटस्थ भूमिका घेतल्याने निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार प्रमिला केणी यांना दोनऐवजी चार मतांनी पराभव पत्करावा लागला आहे.
ठाणे महापालिकेची चार वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर शिवसेनेने महापालिकेत सत्ता स्थापन केली. युतीमधील भाजप, आरपीआय, बसपा या मित्रपक्षांच्या मदतीने शिवसेनेला सत्तेचा सोपान गाठणे शक्य झाले होते. या सत्ता स्थापनेच्या वेळी मित्र पक्षांना महापालिकेतील विविध पदे देण्याचे आश्वासन शिवसेनेच्या ठाण्यातील वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. त्यामध्ये भाजपला अखेरच्या वर्षी स्थायी समिती सभापतीपद देण्याचे ठरले होते. त्यानुसार, यंदाच्या वर्षी महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भाजपकडे जाणार होते. असे असतानाच राज्य तसेच कल्याण-डोंबिवली निवडणुकीपाठोपाठ मुंबई महापालिकेत प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून शिवसेना-भाजप युतीला तडा गेला आहे. त्यामुळे ठाण्यात शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वाचे लक्ष होते. तसेच युतीमधील वादातून शिवसेना उमेदवार उभा करणार असल्याची चर्चाही महापालिका वर्तुळात रंगली होती, परंतु अखेरच्या क्षणी सत्ताधारी शिवसेनेने सत्ता स्थापनेच्या वेळी दिलेला शब्द पाळत स्थायी समिती सभापतीपद भाजपाला देऊ केले.
स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी शिवसेना -भाजपा युतीतर्फे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि राष्ट्रवादीतर्फे प्रमिला केणी हे दोघे निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने उभे होते. सोमवारी दुपारी तीन वाजता कै. अरविंद पेंडसे सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत संजय वाघुले यांना नऊ तर प्रमिला केणी यांना पाच मते मिळाली. त्यामुळे वाघुले यांचा चार मतांनी विजय झाला. असे असतानाच या निवडणुकीत काँग्रेसच्या दोन सदस्यांनी तटस्थ राहून राष्ट्रवादीला एकप्रकारे धक्का दिला आहे. या निवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्यावर फटाक्यांच्या आतषबाजी तसेच ढोलताशांचा गजर करून जल्लोष साजराकेला, मात्र या जल्लोषामुळे रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2016 रोजी प्रकाशित
ठाण्यात स्थायी समिती अखेर भाजपकडे
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-04-2016 at 04:23 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp get thane standing committee post