विधानसभा निवडणुकीनंतर ठाणे जिल्ह्यातील राजकारणावर आपला वरचष्मा टिकविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी कंबर कसली आहे आणि भाजपही शिवसेनेचे जिल्ह्यातील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अंबरनाथ आणि बदलापूरच्या पालिका निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे आपली ताकद आजमाविणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. मात्र, सत्तेचे राजकारण करून वर्चस्व मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांनी आधी या शहरांतील समस्यांची तड लावली पाहिजे. कामे बाजूला ठेवून एकमेकांवर कुरघोडी करत राहिल्यास सामान्यांचे नुकसान होणार आहे.
पाच मैलांगणिक जशी भाषा आणि चालीरीती बदलतात, तसेच राजकारणही. त्यामुळेच केंद्रातील आणि राज्यातील राजकीय सौदे शहरांतर्गत राजकारणात पाळले जातीलच, याची शाश्वती नसते. येत्या एप्रिल महिन्यात येऊ घातलेल्या पालिका निवडणुकांमध्ये बदलापूरमध्ये पुन्हा एकदा त्याची चुणूक दिसणार आहे. ‘तुझे माझे जमेना, परी तुझ्यावाचून करमेना’ या न्यायाने अनेक मतभेद आणि कुरबुरीनंतरही केंद्रात आणि राज्यात सेना-भाजपच्या युतीचा संसार टिकला असला तरी ते सुखाने नांदताहेत असे कुणीही म्हणणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर ठाणे जिल्ह्यातील राजकारणावर आपला वरचष्मा टिकविण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे आणि भाजपही शिवसेनेचे जिल्ह्यातील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. कल्याण तालुक्यातील २७ गावांनी बहिष्कार टाकल्याने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील रण टळले. मात्र आता अंबरनाथ आणि बदलापूरच्या पालिका निवडणुकांमध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे आपली ताकद आजमाविणार हे एव्हाना स्पष्ट झाले आहे.
बदलापूरमधील सेना-भाजपचे भांडण तसे खूप जुने आहे. त्यातूनच गेल्या पालिका निवडणुकीनंतर सत्तेचे नवे समीकरण जुळवून भाजपने राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. हे समीकरण पाच वर्षे टिकले नसले तरी येत्या निवडणुकीतही सत्तेसाठी त्याच सूत्राच्या आधारे सत्ता मिळविण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. त्यातूनच स्थानिक सेना नेतृत्वावर नाराज असणाऱ्या सर्वाचे धुव्रीकरण करण्याचे पद्धतशीर प्रयत्न भाजपकडून केले जात असताना सेनेनेही तीच रणनीती अवलंबली आहे.
विधानसभा निवडणुकीत अनेक समर्थकांसह आमदार किसन कथोरे भाजपमध्ये आल्याने येथील राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले. त्यानंतर राष्ट्रवादीमधील काही किसन कथोरे विरोधकांनी सेनेचा आश्रय घेतला. बदलापूरमध्ये काँग्रेस आणि मनसेचा फारसा प्रभाव नाही. त्यामुळे शहरात आता सेना आणि भाजप हे दोनच प्रबळ राजकीय प्रतिस्पर्धी आहेत. अंबरनाथ तालुक्यातील राजकारणावर किसन कथोरे यांचा प्रभाव असला तरी यापूर्वी पालिका निवडणुकांमध्ये ते फारसे प्रत्यक्षपणे सहभागी झाले नव्हते. या वेळी मात्र बदलापूर पालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे अंबरनाथप्रमाणेच बदलापूरमधील सत्ता टिकविण्यासाठी जिल्ह्यातील सारी संघटनात्मक ताकद पणाला लावणार आहेत.
बदलत्या वास्तवाचे भान हवे
अगदी दहा वर्षांपूर्वी मुंबई परिसरात घर घेतेवेळी अखेरचा पर्याय असणारे बदलापूर आता प्राधान्यक्रमात अग्रभागी आहे. कारण तुलनेने याच शहरात आता किफायतशीर दरात घरे उपलब्ध आहेत. त्यामुळे एमएमआरडीए परिसरात बदलापूरच्या नागरीकरणाचा वेग सर्वाधिक आहे. बांधकाम व्यावसायिकांनी त्याला चौथी मुंबई असे गोंडस नाव दिले आहे. मात्र प्रत्यक्षात स्वप्न आणि वास्तव यात महद्अंतर असते. बदलापूरचीही तशीच परिस्थिती आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील सुविधा अत्यंत अपुऱ्या आहेत. त्याची जाणीवरेल्वे स्थानकातच होते. सकाळ-संध्याकाळच्या पीकअवरमधील प्रवाशांच्या तुलनेत सध्या स्थानकात उपलब्ध असलेले पादचारी पूल अपुरे आहेत. त्यामुळे पुलावर प्रवाशांची कोंडी होते. नवनव्या गृहनिर्माण संकुलांमुळे शहराचा परीघ दिवसेंदिवस वाढत असला तरी अद्याप बदलापूरमध्ये शहरांतर्गत परिवहन व्यवस्था नाही. तूर्त शहरातील वाहतुकीसाठी रिक्षा हाच एकमेव पर्याय आहे. भुयारी गटार योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शहरातील सांडपाणी थेट उल्हास नदीमध्ये सोडले जाते. शहरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची योजना मंजूर असली तरी अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. बॅरेज प्रकल्प तसेच बारवी धरणामुळे बदलापूरला पाण्याची कमतरता नसली तरी विषम वितरण व्यवस्थेमुळे अनेक भागांतील नागरिकांना अजूनही पाणीटंचाई भेडसावते. त्यातच बदलापूर शहराची हद्द वाढविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. हद्दवाढीनंतर हे शहर जवळपास दुप्पट होईल. नवनव्या गृहसंकुलांमुळे नैसर्गिकरीत्या होणाऱ्या विस्तारीकरणाच्या कितीतरी अधिक वेगाने शहराची लोकसंख्या येत्या पाच वर्षांत वाढणार आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या सेना-भाजप युतीच्या नेत्यांना या वास्तवाचे भान ठेवावे लागणार लागेल. कारण हे दोन्ही पक्ष असेच एकमेकांवर कुरघोडी करीत राहिले तर नुकसान अखेर बदलापूरकरांचे होईल. अशा परिस्थितीत निष्क्रिय काँग्रेस आघाडी आणि युती यांच्यात फरक तो काय, असा प्रश्न सर्वसामान्य बदलापूरकरांना पडला तर त्यांना दोष देता येणार नाही.
प्रशांत मोरे
संग्रहित लेख, दिनांक 20th Feb 2015 रोजी प्रकाशित
बदलापूर शहरबात : राज्यातील राजकारणाचे बदलापूर!
विधानसभा निवडणुकीनंतर ठाणे जिल्ह्यातील राजकारणावर आपला वरचष्मा टिकविण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी कंबर कसली आहे आणि भाजपही शिवसेनेचे जिल्ह्यातील वर्चस्व मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

First published on: 20-02-2015 at 12:03 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp shiv sena fighting badlapur local body poll separately