ठाणे शहराहसह दिवा परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून, या बांधकामांमागे मोठी टोळीच कार्यरत आहे. बेकायदा बांधकामं रोखसाठी ज्यांना नेमताय, तेच बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत आहेत. असा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी आज (सोमवार) पत्रकारांशी बोलताना केला.

तसेच, बेकदायदा बांधकामांचे हीत जोपासणाऱ्या राजकीय नेत्यांच्या वशीलेबाजीतून अशा अधिकाऱ्यांची निवड केली जात असल्याचा आरोप करत, शहरातील शंभर बेकायदा बांधकामांची यादी पालिका आयुक्तांना लवकरच देणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आयुक्तांना बेकायदा बांधकामे दिसत नाहीत का? –

ठाणे महापालिका क्षेत्रात करोना काळात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहीली असून, ही बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई पालिका प्रशासनाने हाती घेतली होती. मात्र ही कारवाई थंडावताच भूमाफीयांनी पुन्हा बेकायदा बांधकामे उभारण्यास सुरुवात केली. दिवा भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे सुरु असल्याचा आरोप होत असून त्याचबरोबर शहरातही बेकायदा बांधकामे सुरु असल्याची ओरड होत आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्त डॉ. शर्मा हे ठाणे शहराचे दौरे करीत असून त्यामध्ये त्यांना बेकायदा बांधकामे दिसत नाहीत का?, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. असे असतानाच भाजपाचे आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन बेकायदा बांधकामांवर कारवाईची मागणी केली.

या भेटीनंतर आमदार केळकर आणि डावखरे यांनी पत्रकारांशी संवाद साधून पालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका केली. दिवा नव्हे तर संपूर्ण ठाणे शहरात बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून या बांधकामांमागे मोठी टोळीच कार्यरत आहे. दिवा येथे आमदार निधीतून उभारलेले ई शौचालयाचे बांधकाम तोडण्यात आले पण, त्यासमोरच सुरु असलेल्या बेकायदा बांधकामांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, अशी टीका केळकर यांनी केली. तसेच बेकायदा बांधकामे रोखण्याच्या कामासाठी ज्यांना नेमताय, तेच बेकायदा बांधकामांना पाठीशी घालत आहेत. या प्रकारामुळे ठाण्यातील जनता आता रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील त्यांनी दिला. याचबरोबर, बेकायदा बांधकामांबाबत योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.

कुंपणच शेत खातंय –

दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. परंतु महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई संशयास्पद असल्याची चर्चा नेहमी होते. काही हितसंबंधी व्यक्तींची बांधकामे वाचविण्यासाठी बिल्डरांना कारवाईची आगाऊ खबर दिली जाते. त्यामुळे बडी बांधकामे वाचविली जातात. तर किरकोळ बांधकामांवर कारवाईचा दिखावा निर्माण केला जातो. या आरोपांना दुजोरा देणारी एक ध्वनीफित प्रसारीत झाली आहे. त्यामध्ये `नाना, उद्या सकाळीच कमिशनर साहेब दिव्यात आहेत. सगळी कामे कटाक्षाने बंद ठेवा’, अशा सूचना एका महिला अधिकाऱ्याकडून दिल्या जात आहेत. या ध्वनीफितची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. त्यामुळे कुंपणच शेत खातंय, असा आरोप भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. आयुक्तांच्या दिवा दौऱ्याची अगोदरच खबर देऊन अनधिकृत बांधकामे बंद ठेवण्याचे सांगणारी ती महिला अधिकारी कोण आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर ही ध्वनीफित पेन ड्राईव्हच्या माध्यमातून आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आली असून या अधिकारीचा शोध घेऊन त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणीही केली आहे, असेही ते म्हणाले.