तांत्रिकाच्या सल्लय़ाने चुलत्याची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या पुतण्याला पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. व्यवसायात आर्थिक नुकसान होत असल्याने त्याने काकांच्या हत्येसाठी दोन लाखांची सुपारी दिली होती.

नालासोपारा येथे राहणारे व्यापारी रोशनलाल गुप्ता यांचा तेल आणि मैदा वितरीत करण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा पुतण्या मिथिलेश गुप्ता हाही हाच व्यवसाय करत असल्याने दोघांमध्ये सतत व्यवसायावरून खटके उडत असत. काही महिन्यापूर्वी मिथिलेश आजारी पडला असल्याने व्यापारात नुकसान होऊ लागले. यावर उपाय म्हणून त्याने एका तांत्रिकाशी संपर्क साधला. तांत्रिकानेत्याला तुझ्या चुलत्याने तुझ्यावर करणी केली असल्याने तुला व्यापारात नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगितले. तांत्रिकाची गोष्ट मनात ठेऊन मिथिलेशने चुलत्याचा काटा काढायचे ठरवले. त्यासाठी त्याने नालासोपारा येथे एका बेकरीत काम करणाऱ्या फिरोज शराफतो अन्सारी याला रोशनलालच्या हत्येची दोन लाख रुपयांची सुपारी दिली. या कामासाठी त्याने १० हजार अनामत रक्कम दिली.

अन्सारीने हत्तेचा कट तयार केला. त्याने परवेज अन्सारी, अजय बिडम्लान, रिझवान जमाल खान आणि मंगलू गुप्ता या मित्रांना सामील केले. हत्येची पूर्ण तयारी झाली असल्याचे मिथिलेशला सांगितले आणि इतर पैशाची तयारी करण्यास सांगितले. परंतु मिथिलेश सतत हत्येची तारीख बदलत होता. दरम्यान पालघर गुन्हे शाखेला माहितीदाराच्या मदतीने या कटाची माहिती लागली आणि पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून सहा आरोपींना अटक केल्याची माहिती पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीतेंद्र वनकोटी यांनी दिली.