जिल्हा परिषद शाळांच्या सर्वागीण विकास होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपला सहभाग वाढवला पाहिजे. शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे या संस्थांचा दर्जा सांभाळण्यासाठी स्थानिक संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.
– भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीकरांसाठी ‘डोंबिवलीकर दूध’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांची खूप दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषद शाळा शिक्षकांकडून डिजिटल करण्यात येत आहेत. शाळांमध्ये संगणक, इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु या शाळांना वाणिज्य दराने महावितरणकडून देयके पाठवण्यात येण्यात येत आहेत. ही वाढीव देयके भरणे शाळांना शक्य नाही. त्यामुळे महावितरणकडून शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. यावर तावडे यांनी समस्यांवर त्वरीत उपाय शोधले जातील, असे स्पष्ट केले.
– योग्य विचार करूनच २७ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. गावांचा विकास होण्यासाठी दूरदृष्टी ठेवून ही पावले उचलण्यात आली आहेत, असे तावडे यांनी स्पष्ट केले. रॉयल इंटरनॅशनल शाळेत झालेल्या प्रवेश प्रक्रिया राबविण्यावरून झालेल्या प्रकाराची शिक्षणाधिकारी चौकशी करतील. असे प्रकार संस्थांकडून होता कामा नयेत, असे तावडे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
– डोंबिवलीकर दूध हा चांगला उपक्रम आहे. स्थानिक पातळीवर या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.