सापळा लावून शिकार केल्याचा संशय

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील जंगलांत शिकारीचे प्रमाण वाढले असून अनेक वन्यजीवांचा शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकून मृत्यू होत आहे. शनिवारी कल्याण तालुक्यातील रायते ते टिटवाळा यादरम्यानच्या जंगलात दोन मोरांचे मृतदेह आढळून आले असून सापळ्यात अडकून त्यांचा मृत्यू झाला आहे. वन विभागाने याबाबत पाहणी केली असून सापळा लावून जाणीवपूर्वक शिकार केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

कल्याण तालुक्यातील रायते ते टिटवाळा यादरम्यानच्या जंगलामध्ये शनिवारी दोन मोर मृतावस्थेत आढळून आले आहेत. तारेच्या फासात हे मोर अडकल्याचे अश्वमेध प्रतिष्ठानच्या तुषार पवार, दीपक जाधव, निखिल गडगे आणि स्वप्निल सुरोशी यांना आढळून आले. त्यांनी तातडीने ही बाब वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकाराचा पंचनामा केला आहे. हा प्रकार यापूर्वीही येथे झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांत टाळेबंदीमुळे शेतघर, जंगलात फेरफटका मारणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा वेळी शेतघरांमध्ये वास्तव्यास आलेल्यांपैकी अनेक जण हौसेपायी शिकार करतात. त्यातून हा प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अशा प्रकारे भेकर, ससे, रानमांजर या प्राण्यांची शिकारही केली जाते. या प्रकरणी अधिक माहितीसाठी या भागातील वनक्षेत्रपाल कल्पना वाघेरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पर्यावरणप्रेमींचे समूह करण्याचे प्रयत्न

राष्ट्रीय पक्ष्याचा मान मिळालेल्या मोरांचा अशा प्रकारे सापळ्यात अडकून मृत्यू होणे दुर्दैवी आहे, असे मत ठाणे जिल्ह्यातील मानद वन्यजीवरक्षक आणि अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड यांनी सांगितले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध गावांमध्ये यासाठी काम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींचे समूह करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.