बदलापूर : मुरबाड तालुक्यातील पोटगावच्या जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दोन तरुणींचे मृतदेह आढळून आले आहेत.

कल्याण तालुक्यातील केळणी हे गाव पोटगावपासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे. या केळणी गावातील या दोन तरुणी (वय १८ आणि १९) रानात जातो असे सांगून शुक्रवारी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र या घरी परतल्या नाही. सोमवारी पोटगावातील काही तरुण जंगलातील रानभाज्या गोळा करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांना दोन तरुणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी  मुरबाड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या दोन्ही तरुणींचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. दोन्ही तरुणींनी क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तरी शवविच्छेदन अहवालातून त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.