हेमेंद्र पाटील

पादचारी पुलाचे काम रखडले, शेड नसल्याने अडचण, प्रतीक्षालयात घुसखोरी

उपनगरी रेल्वे स्थानकात उत्पन्नामध्ये अग्रगण्य असलेल्या बोईसर रेल्वे स्थानकातील सुविधांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. औद्योगिक क्षेत्रामुळे हे स्थानक महत्त्वाचे असून दररोज हजारो कामगार येथे येत असतात. मात्र रेल्वे स्थानकात सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

हे स्थानक एस.जी-१ दर्जाचे असून तिकिटाचे उत्पन्न महिन्याला १ कोटी २५ लाख इतके आहे. त्यातच प्रत्येक तिकिटावर लावलेल्या उपनगरी करापोटी रेल्वे प्रशासन सुमारे १२ लाख रुपये वसुली करीत आहे. असे असतानाही येथील समस्या मात्र सुटताना नाव घेत नाहीत.

रेल्वे स्थानकावर मुंबईवरून येणाऱ्या गाडय़ा या तांत्रिक कारणाने फलाट २ वर येत असल्याने प्रवाशांची गर्दीच्या वेळी तारांबळ उडते. अपंगांसाठी बांधलेल्या पुलाची लांबी जास्त असल्यामुळे तेथून जाण्यासाठी खूप वेळ लागतो. ऐनवेळी ट्रेन सुटत असल्याने प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडून जावे लागते.

पादचारी पुलाला पायऱ्या लावण्यासाठी २०१५ मध्ये निर्णय झाला होता, त्याचे काम प्रत्यक्षात मार्च २०१८ मध्ये सुरू झाले असून महिनाभरापासून ते बंद आहे.  फलाट क्रमांक २ व ३ वर काही भागांत शेड नसल्याने पावसाळ्यात भिजत ट्रेनमध्ये प्रवेश करावा लागतो. उन्हाळ्यातदेखील उन्हात उभे राहावे लागते.

फलाट क्रमांक २ वर असलेले शौचालय कित्येकदा बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. रेल्वे स्थानकावर रेल्वे उशिरा येत असल्याबाबत कोणत्याही प्रकारे सूचना दिली जात नाही. जर एखादी ट्रेन वेळेवर नसेल तर पूर्वनिश्चित  वेळेच्या आधी सूचना देणे गरजेचे असतानादेखील त्याकडे दुर्लक्ष होते. गर्दीच्या वेळी तिकीट खिडकीवर गोंधळ होतो. तिकीट घेतल्यावर पैसे परत घेताना कमी दिले जात असल्याच्या तक्रारीही आहेत.  रेल्वे स्थानक परिसरात चारचाकी वाहनांसाठी वाहनस्थळाच्या जागी रिक्षा उभ्या राहतात. त्यामुळे इतर वाहनांसाठी जागाच उपलब्ध नसते. लांबून येणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका बसतो. प्रवाशांसाठी बांधलेल्या प्रतीक्षास्थळाचा ताबा बाहेरील लोकांनी घेतला आहे. इतर कामगार झोपलेले असतात त्यामुळे त्या ठिकाणी प्रवाशांना बसता येत नाही.  महत्त्वाचे म्हणजे बोईसर रेल्वे स्थानक हे अजूनही वलसाड कंट्रोलवरून चालविले जात असून कोटय़वधींचे उत्पन्न असलेल्या बोईसर स्थानकाला सोयीसुविधांची आस लागली आहे.

बसस्थानकापर्यंत स्कायवॉकची गरज

बोईसर परिसरात वाढती वाहनांची वर्दळ व रेल्वे स्थानक परिसरात गर्दीच्या वेळी प्रवाशांना रस्त्यावर चालण्यासाठी कसरत करावी लागते. यासाठी स्टेशनपासून थेट नवापूर रोडपर्यंत व दुसऱ्या बाजूला बस स्थानकापर्यंत स्कायवॉकची गरज आहे. ते झाल्यास वाहतूक कोंडीदेखील कमी होईल.

पश्चिमेकडून स्टेशनला प्रवेश करणे त्रासदायक असते. रिक्षास्थळासाठी योग्य जागा नसल्याने त्यांना जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. रस्त्यात उभ्या असलेल्या वाहनांमुळे प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी अडथळा होतो. फलाट क्रमांक १ वरून सतत होणारे मालवाहू गाडय़ांचे इंजिन जोडणी सुरू असते. त्याच्या मोठय़ा आवाजाने त्रास होतो.

– विजय शेट्टी, अध्यक्ष डहाणू- वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

* बोईसर रेल्वेचे २०१६-१७ चे वार्षिक उत्पन्न २५ कोटी ५८ लाख १० हजार १३२ एवढे आहे.

* स्थानकावरून वर्षांला ९७ लाख ५१ हजार ०८९ एवढे प्रवासी प्रवास करतात.

* रेल्वे स्थानकावर २ एटीव्हीएम मशीन असून एक नेहमी बिघडलेले असते. प्रवाशांच्या सुविधेसाठी ४ एटीव्हीएमची गरज आहे.