‘मूड्स ऑफ क्राइम’ चे संपूर्ण चित्रीकरण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तलावपाळी, उपवन, दादोजी कोंडदेव क्रीडांगण, घोडबंदर परिसर, ठाण्यातील टीएमटीचे बसथांबे आणि वेगवेगळे रस्ते..मराठी चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी हक्काचे स्थान बनले असतानाच आता बॉलीवूडनेही ठाण्याकडे मोर्चा वळविला आहे. ठाणे शहरामध्ये अलीकडेच ‘मूड्स ऑफ क्राइम’ या बॉलीवूडपटाचे संपूर्ण चित्रीकरण झाले असून या चित्रपटातील प्रत्येक दृश्य ठाण्यात चित्रित करण्यात आले आहे. ठाण्यात चित्रीकरण झालेला पहिला बॉलीवूडपट अशी ओळख या निमित्ताने या चित्रपटाला मिळाली आहे. ठाणेकर असलेले निर्माता आणि दिग्दर्शक सुनील शहा यांनी हा चित्रपट साकारला असून ठाणे स्थानक परिसर, तलावपाळी, उपवन, फ्लॉवर व्हॉली आणि शहरातील विविध ठिकाणी या चित्रपटाच्या दृश्यांचे चित्रीकरण झाले आहे. त्यानिमित्ताने ठाणे शहराचे सौंदर्य प्रथमच हिंदी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.

मुंबई हे भारतीय चित्रपटसृष्टीचे माहेरघर मानले जाते. चित्रपटसृष्टीचा जन्म आणि विकास याच मायानगरीत झाला. आता २१ व्या शतकातही मुंबई हे बॉलीवूडचे प्रमुख केंद्र मानले जाते. मुंबईतील जुहू, अंधेरी, ओशिवरा, लोखंडवाला, गोरेगाव आदी ठिकाणी नेहमी चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. त्याचाच फायदा घेऊन अनेक मंडळी या भागामध्ये येणाऱ्या नव्या चित्रपट निर्मात्यांना अक्षरश: लुटत असून या विरोधात कुणीही काहीच करत नव्हते.

ठाणे शहरामध्ये स्थापन झालेल्या ‘भूमी’ निर्मिती संस्थेचे सुनील शहा यांना मुंबईतील अंधेरी भागातील चित्रीकरणाच्या व्यवहारात अधिकृत आणि अनधिकृतपणे होणाऱ्या लूटमारीचा अनुभव आल्यामुळे आपण राहतो त्याच परिसरात चित्रपट चित्रित करण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ठाणे शहरामध्ये ‘मूड्स ऑफ क्राइम’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचे निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक ठिकाणांमध्ये ठाणे स्थानक रस्ता, तलावपाळी, कॅफे व्हव्‍‌र्ह, विकास कॉम्प्लेक्स, उपवन, चॉकलेट रूम, महावीर उमंग, विहंग पाम क्लब, फ्लॉवर व्हॅली आणि मुलुंड येथील ईस्टर्न मॅजेस्टी या ठिकाणांवर या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले आहे.

चित्रपटाविषयी थोडेसे..

‘मूड्स ऑफ क्राइम’ ही कथा गुन्हेगारी मानसशास्त्र शिकणारे दोन विद्यार्थी झुबिन, निवेदिता आणि त्यांच्या प्राध्यापिका पूजा यांची आहे. गुन्हेगारी मानसशास्त्राचा अभ्यास करीत असल्यामुळे केवळ अनुभव म्हणून हा विषय कृती करून अभ्यासू या, या विचाराने हे तरुण एका गुन्ह्य़ामध्ये अडकतात. त्यातूनच त्यांना लागलेल्या गुन्ह्य़ाच्या सवयीचे चित्रण या चित्रपटात आहे. अत्यंत वेगळ्या धाटणीचा हा कलात्मक चित्रपट असून ‘इंडियन सिनेफिल्म फेस्टिव्हल २०१५’ मध्ये या चित्रपटाला ज्युरी पसंतीचा सन्मान मिळाला आहे.

ठाणे स्थानक परिसरातील अशोक टॉकीज ते जांभळी नाकादरम्यान या चित्रपटाच्या एका पाठलाग दृश्याचे चित्रीकरण करायचे होते. या भागातील गर्दी पाहून चित्रपटाचा मदतगट हादरून गेलो. मात्र ठाणे पोलिसांच्या सहकार्याने या भागातील चित्रीकरण करण्यात आले. अवघे पाच हजार रुपये शुल्क भरून आम्ही हे चित्रीकरण पूर्णत्वास गेले. मात्र मुंबईमध्ये याच दृश्यासाठी ७० ते ८० हजारांचे शुल्क अनधिकृतपणे उकळले गेले असते.

– सुनील शहा, निर्माता दिग्दर्शक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood in thane
First published on: 04-08-2016 at 03:57 IST