स्फोट घडवून हत्येचा प्रयत्न | Loksatta

स्फोट घडवून हत्येचा प्रयत्न

बॉम्बचा स्फोट घडवून तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना २६ जुलै रोजी भिवंडी येथे घडली.

स्फोट घडवून हत्येचा प्रयत्न
प्रातिनिधिक छायाचित्र.

प्रेमप्रकरणातील वादातून तिघांचे कृत्य
भेटवस्तूच्या आत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवून तरुणाची हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना २६ जुलै रोजी भिवंडी येथे घडली. याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मित्राच्या प्रेयसीवरून झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचे समजते. या स्फोटात तरुण सुखरूप बचावला, परंतु त्याची आई गंभीर जखमी झाली. विशेष म्हणजे, हा बॉम्ब आरोपींनी स्वत:च बनवल्याचे उघड झाले आहे.
प्रमोद दळवी, त्याचा भाऊ सिद्धेश दळवी आणि रोशन शेलार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. भिवंडी येथील पडघा भागातील खालिंद गावात राहणारा तरुण अभिजित घरत हा २६ जुलै रोजी भावाच्या दुकानावरून परतत असताना त्याला मोटारसायकलला एक पिशवी अडकवलेली दिसली. त्या पिशवीतील भेटवस्तूवर ‘अभिजित घरतसाठी स्पेशल गिफ्ट.. बाटलीचा ढाकन उघड’ असे लिहिले होते. मात्र, या भेटवस्तूतून उग्र वास येत असल्याने अभिजितने ती न उघडता घरातील एका कोपऱ्यात नेऊन ठेवली. त्याच्या आईने उत्साहापोटी ही बाटली उघडली असता, त्याचा स्फोट झाला. यात अभिजितची आई जबर जखमी झाली.
या घटनेची माहिती मिळताच, पडघा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास सुरू केला. त्यात अभिजितच्या हत्येसाठी हा स्फोट घडवण्यात आल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास करून तिघा आरोपींना अटक केली. खालिंद गावातील प्रसाद बळीराम शेलार याचे एका मुलीसोबत गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. त्याच मुलीसोबत प्रमोद प्रभाकर दळवी याने प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. प्रसाद शेलार आणि अभिजित घरत हे दोघे जिवलग मित्र आहेत. त्यामुळे दोन महिन्यांपूर्वी अभिजित आणि प्रसाद या दोघांनी प्रमोद दळवीला त्या मुलीचा नाद सोडण्यास सांगितले होते. तसेच अभिजितने त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. यातूनच प्रमोदने त्याचा भाऊ सिद्घेशच्या मदतीने अभिजितच्या हत्येचा कट रचला होता, असे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.
बाटली बॉम्बचे ज्ञान..
प्रमोदचे आयटीआयपर्यंत, तर सिद्घेशचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. तर रोशन हा कला शाखेच्या दुसऱ्या वर्षांत शिक्षण घेत आहे. शाळेतील विज्ञान प्रदर्शनामध्ये सिद्धेश नेहमीच भाग घ्यायचा. त्यामुळे त्याला इलेक्ट्रिक सर्किट बनविण्याचे ज्ञान आहे. यामुळे त्याने इलेक्ट्रिक सर्किटचा वापर करून बाटली बॉम्ब तयार करण्याचा आणि त्याद्वारे स्फोट घडवून अभिजितला संपविण्याचा कट रचला. या बॉम्बसाठी त्याने एका मासेमारी करणाऱ्या मित्राकडून डिटोनेटर मिळविले. माचिसच्या काडय़ांचा गूल काढला. सुतळी बॉम्बमधील दारू काढली. अशाप्रकारे त्याने बाटली बॉम्ब तयार केला. या बॉम्बचा स्फोट होतो का, याची चाचपणी त्याने घराच्या परिसरातील जंगलात केली. हा बॉम्ब तयार करण्यासाठी रोशन याने त्याला मदत केली. बॉम्बचा स्फोट होत असल्याची खात्री झाल्यानंतर त्याने हा बॉम्ब निनावी भेटवस्तू स्वरूपात अभिजितच्या मोटारसायकलवर नेऊन ठेवला, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2016 at 00:52 IST
Next Story
मुसळधार पावसात रेतीउपसा