जयंत सावरकर, अभिनेते
स्वत:ची वाणी शुद्ध करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे वाचन. वाचनामुळे आपण सुसंस्कृत होतो. आई-वडील आपल्यावर चांगले संस्कार करतात त्याचप्रमाणे वाचन हेसुद्धा एका आई-वडिलांसारखेच त्या वाचकाला संस्कारक्षम बनवते. वाचनामुळे जगाकडे बघण्याचा एक विशाल दृष्टिकोन आपल्यात येतो. वयाच्या पाचव्या वर्षांपासून माझा वाचनाशी खूपसा संबंध यायला लागला. पाच वर्षांचा असताना मी भगवदगीता वाचावयास घेतली आणि एका स्पर्धेमध्ये त्याचा १५ वा अध्यायसुद्धा म्हणून दाखवला होता. लहानपणी भगवदगीतेपासून सुरू झालेले हे वाचन संस्कार आजपर्यंत विविध प्रकारच्या पुस्तक वाचनामुळे अधिकाधिक वृद्धिंगत झाले आहेत.
माझ्या वाचनकलेची सुरुवात लहानपणी माझ्या वडिलांमुळे आणि शालेय अभ्यासातील इतिहास व मराठी या पुस्तकांमुळे झाली. माझे वडील त्यावेळी केसरी वर्तमानपत्र वाचत आणि त्यांचे ते वर्तमानपत्र वाचन बघून हळूहळू माझ्यातसुद्धा वर्तमानपत्र वाचनाची गोडी निर्माण झाली. वयाच्या पाचव्या वर्षांपासून मी गीता पठण स्पर्धा, शुद्धलेखन स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धामध्ये भाग घेत असल्याने साने गुरुजी यांचे ‘श्यामची आई’, ‘रामायण’, ‘महाभारत’ त्याचबरोबर शालेय अभ्यासक्रमातील मराठी विषयाचे ‘अरुण वाचन माला’ अशी अनेक पुस्तके वाचली. नाथ माधव यांचे ‘वीरधवल’, ‘स्वराज्याची स्थापना’, ‘स्वयंसेवक’ अशा ऐतिहासिक कादंबऱ्या, बाबुराव अर्नाळकर यांच्या ‘झुंझार’ कथा, ‘सिंहगर्जना’ अशा अनेक रहस्य कथासुद्धा बालपणी मला वाचायला आवडत. महाविद्यालयीन जीवनात मी कॉमर्सचा डिप्लोमा करत असल्याने पुस्तक वाचनाशी माझा संबंध जरा कमी येत असे. त्यामुळे त्यावेळी मी वि. द. घाटे यांची ‘पांढरे केस’, ‘हिरवी मने’, ‘बाजी’ आणि ‘डॅडी’, वि. स. खांडेकर यांची ‘कांचनमृग’, ‘रानफुले’, ‘दवबिंदू’ अशी काहीशी कमीच पुस्तके माझा वाचनात आली. महाविद्यालयीन जीवनानंतर ना.सी. फडके यांच्या ‘दौलत’, ‘हाक’, ‘उद्धार’, इंद्रायणी सावकार यांच्या ‘बाळा-बापू’ , ‘वारस’ या कादंबऱ्या मी वाचल्या. पुस्तक वाचनापेक्षा वर्तमानपत्र किंवा साप्ताहिक मला अधिक वाचायला आवडत असल्याने आचार्य अत्रे यांचे ‘नवयुग’ हे साप्ताहिक, चि. वि.बावडेकर यांचे ‘आलमगीर’ हे साप्ताहिक, सर्वप्रथम त्रंबक विष्णू पर्वते यांनी संपादित केलेला ‘लोकसत्ता’ सुद्धा मी आवडीने वाचत असे. त्याचबरोबर प्रभाकर पाध्ये यांचे विविध विषयांवरील अग्रलेख, आचार्य अत्रेंचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील अग्रलेखसुद्धा मला वाचावयास आवडत. व्यावसायिक नाटकात काम करायला लागण्यापासून विविध नाटकांच्या पुस्तकांचे वाचन हेच काय ते माझं वाचन असं समीकरण निर्माण झाले. राम गणेश गडकरी यांचे ‘एकच प्याला’, ‘प्रेमसंन्यास’, ‘पुण्यप्रभाव’, ‘वेडय़ांचा बाजार’, अशी त्यांनी लिहिलेली सगळी नाटके मी वाचली आहेत. त्याचबरोबर गडकरींनी लिहिलेल्या सगळ्या नाटकात मी कामसुद्धा केले आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांची मानापमान, कीचकवध’, ‘भाऊबंदकी’, अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे ‘शाकुंतल’, ‘सौभद्र’ ही नाटकेसुद्धा मी वाचली आहेत. गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संशयकल्लोळ’ या मराठी नाटकाबरोबरच ‘मृच्छकटिकम’ हे संस्कृत नाटक मी वाचले आहे व त्यात कामसुद्धा केले आहे. पु. ल. देशपांडे यांची ‘तुझं आहे तुझं पाशी’, ‘अंमलदार’, अशा नाटकासंबंधी पुस्तकांबरोबरच ‘बटाटय़ाची चाळ’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी सगळी पुस्तकेसुद्धा मी वाचली आहेत. मो.ग. रांगणेकर यांचे ‘कुलवधू’, ‘माझं घर’, ‘आशीर्वाद’, विजय तेंडुलकर यांची ‘कमला’, ‘गिधाडे’, ‘श्रीमंत’, जयवंत दळवी यांचे ‘सूर्यास्त’, ‘नातीगोती’, ‘बॅरिस्टर’ अशी सगळी नाटके मी अभ्यासपूर्ण वाचली आहेत. आचार्य अत्रे यांची ‘घराबाहेर’, ‘जग काय म्हणेल’, नागेश जोशी यांची ‘देव माणूस’, ‘मैलाचा दगड’सुद्धा मी वाचले आहे. या सगळ्या वाचलेल्या नाटकांसंबंधीची विशेष बाब म्हणजे वाचलेल्या सगळ्या नाटकात मी विविध धाटणीच्या निरनिराळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या सगळ्या नाटकासंबंधीच्या पुस्तकांबरोबर मला आत्मचरित्र वाचावयास आवडत असल्याने मी हंसा वाडकर यांचे ‘सांगते ऐका’, ‘लोकमान्य टिळकांचे आत्मचरित्र’, दुर्गाबाई खोटे यांचे आत्मचरित्र अशी विविध दिग्गज व्यक्तिमत्त्वांची आत्मचरित्रे वाचली आहेत. माझा घरात एकूण १००० ते १२०० पुस्तक, कादंबऱ्या, आत्मचरित्र, नाटकांची पुस्तके असून ती पुस्तके ठेवायला घरात विशिष्ठ असे बुकशेल्फ नसून सगळी पुस्तके घरातल्या एका कपाटात व्यवस्थितपणे मांडून ठेवली आहेत. सध्या सहसा कुठे न मिळणारी ‘एकच प्याला’, ‘पुण्य प्रभाव’ अशी काही दुर्मीळ नाटकांची पुस्तकं सुद्धा माझ्या संग्रही आहेत. पुस्तकांबाबत माझे जास्त शेअरिंग माझ्या बायको बरोबर जास्त होते. कारण दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकार वाचावयास आवडत असल्याने पुस्तकांची देवाणघेवाण खूप चांगल्या प्रकारे होते किंवा कुठलं पुस्तक हवंच असेल आणि ते दोघांकडेही नसलं तर ते ग्रंथालयातून वाचायला आणतो किंवा सरळ जाऊन नवीन विकत घेतो. वाचनासंदर्भात मी एक नक्की सांगेन की सर्वार्थाने शहाणे होण्यासाठी खूप वाचन करा; परंतु कुठचीही गोष्ट वाचताना त्याचा कमीतकमी अर्धा भाग हा मोठय़ाने वाचा जेणेकरून आपण काय वाचतोय ते आपल्याला ऐकू येईल आणि जिभेचा सुद्धा व्यायाम होईल मग राहिलेला अर्धा भाग हा स्वत:ची करमणूक म्हणून मनात वाचावा ज्यामुळे वाचन, जिभेचा व्यायाम, आणि करमणूक अशा तीनही गोष्टी होऊन जातात.