डोंगर, माती, दगड आणि झाडे याव्यतिरिक्तचे विश्व माहिती नसलेली वीटभट्टी कामगारांची मुले ठाण्याच्या कोरम मॉलमध्ये आली आणि तेथली झकपक पाहून भारावून गेली. कल्याणमधील प्रेमसेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा व समाजसेविका स्टेला मोराईस यांनी कोरम मॉलमध्ये उन्हाळी सुट्टीनिमित्त सुरू असलेल्या शिबिरात वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांना सहभागी करण्याचा निर्णय घेतला. या शिबिरात सहभागी होणाऱ्या या मुलांना त्यामुळे वेगळे भावविश्व अनुभवता आले.
वीटभट्टीवरील मुले खूप गरीब असतात. त्यांना डोंगरदऱ्या सोडून बाहेरचे विश्व माहिती नसते. त्यामुळे आपल्या उन्हाळी सुट्टीच्या शिबिरात वीटभट्टीवरील २५ मुलांना सहभागी करून घ्या, असे मोराईस यांनी कोरम मॉलच्या व्यवस्थापनाला सांगितले. व्यवस्थापनाने त्यांची मागणी मान्य केली. कल्याणमधील वाडेघर, भिवंडीजवळील पिंपळास, खारबाव भागांतील वीटभट्टीवरील मुलांना संघटित करण्यात आले. पाच ते पंधरा वयोगटातील ही मुले होती. या मुलांना दोन दिवस अगोदर तुम्हाला मॉल पाहण्यास जायचे आहे, असे प्रेमसेवा महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वीटभट्टीवरील कामगारांना सांगितले. त्यांनी मुलांना ‘ठाण्याला तुम्हाला मोठी इमारत पाहायला जायचे आहे. तेथे दुकाने असतात. खायला मिळते, पण ते महाग असतेय. फक्त पाहायचे, कशाला हात लावायचा नाही,’ असे सांगितले.
शहरात जायचा एक वेगळा उत्साह या मुलांमध्ये होता. प्रेमसेवा महिला मंडळाची बस वीटभट्टीवर हजर झाली. मुले ओळीने बसमध्ये बसली आणि ठाण्याच्या दिशेने कोरम मॉलचा प्रवास सुरू झाला. कोरम मॉलच्या प्रवेशद्वारात उतरल्यानंतर इतक्या भव्यदिव्य इमारतीकडे पाहून मुले आवाक् झाली. एकाच घरात (इमारतीत) एवढी दुकाने पाहून मुले भारावली. चारही बाजूंचे लखलखीत दिवे, झुंबरे पाहून मुले नवीन विश्वात आल्यासारखी वावरत होती. डोळ्यात जेवढे साठविता येईल तेवढे साठविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मॉलमधील शिबिरात मुले सहभागी झाली. तेथे त्यांच्या मनोरंजन, धावणे, उडय़ा मारण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. आदिवासी भागातील ही मुले असल्याने त्यांनी सराईतपणे स्पर्धामध्ये यश मिळवून बक्षिसे पटकावली. कधी न येणारे ‘पाहुणे’ मॉलमध्ये आल्याने बहुतांशी दुकानदारांनी मुलांना मोफत खेळणी भेट दिली. काहींनी भरपेट खाऊ दिला. दुकाने, इमारत, ग्राहकांकडे पाहत पाहत आपल्या अनवाणी पायांकडे कोणी पाहत आहे याचे भान या निरागस मुलांना राहिले नव्हते. मॉलचा कोपरा पाहून झाल्यानंतर व तेथील गंमत अनुभवल्यानंतर भरल्या मनाने परत आपणास येथे कधी येण्यास मिळेल का, असा सूर लावत या मुलांनी परतीच्या प्रवासाची वाट धरली. या मुलांच्या प्रवासाचे नियोजन मंडळाच्या गीता पाटील, चैत्राली बोराडे, सुनंदा साठे, निशा खारखंडी, रजीना आणि सविता देशमुख यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Brick kiln workers children visit korum mall
First published on: 18-05-2016 at 05:00 IST