कल्याण- दारू पिताना चखणा आणून दिला नाही म्हणून एका टोळक्याने बहिण-भावाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उघडकीस आला असून या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. कल्याण पश्चिमेत उंबर्डे भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी सहा तरुणांना अटक केली आहे. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील सम्राट अशोक नगर भागात एक इमारतीच्या तळ मजल्यावरील वाहनतळाच्या जागेत सहा तरुण दारुची मेजवानी करत बसले होते. दारू पिऊन त्यांचा तेथे धिंगाणा सुरू होता.
दारू पित असताना लागणारा चखणा पुरेसा नसल्याने त्यांनी ते मेजवानीसाठी बसलेल्या इमारती जवळून बहिणी सोबत जात असलेल्या रोहन चव्हाण या तरुणाला थांबविले. त्याला १० रुपये देऊन बाजुच्या दुकानामधून चखणा घेऊन येण्यास सांगितले. दारू पिणारी मुले आपल्या भावाला वस्तू आणण्यास सांगतात. त्याचा बहिण सोनालीला राग आला. तिने भाऊ रोहनला दुकानात न जाण्यास सांगितले. यावरून दारू पीत बसलेल्या तरुणांनी रोहनच्या बहिणीला जाब विचारला. तिने रोहनला दुकानात न जाण्याचा आग्रह कायम ठेवला.
या रागातून मद्यी तरुणांनी प्रथम अल्पवयीन रोहन आणि त्यानंतर त्याची बहिण सोनालीला बेदम मारहाण केली. एकावेळी सहा तरुण मारहाण करू लागल्याने ते दोघे घाबरले. मोठ्या मुश्किलीने दोघे त्यांच्या तावडीतून निसटले. ही मारहाण सुरू असतानाच्या घटनेचे एका जागरुक नागरिकाने मोबाईलच्या कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. त्याने ही चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरु करून त्या सहा तरुणांना अटक केली.