ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमधील बिल्डरांचे विकास प्रस्ताव तसेच विकास हक्क हस्तांतरणासंबंधीचे निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शहर विकास विभागासंबंधीचे सर्व महत्त्वाचे निर्णय यापूर्वी आयुक्त स्तरावर घेतले जात असत. असे असताना आयुक्त जयस्वाल यांच्या खास मर्जीतील ओळखले जाणारे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडे या विभागाचा कार्यभार सोपविण्यात आल्याने महापालिका वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाणे महापालिकेतील शहर विकास विभाग आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाचा मानला जातो. बिल्डरांशी संबंधित असलेल्या या विभागात विकास प्रस्तावाविषयी अनेक तक्रारी, दावे-प्रतिदावे सातत्याने दाखल होत असतात. त्यामुळे या महत्त्वाच्या विभागाची सूत्र आयुक्तपदावरील अधिकारी स्वत:कडे ठेवतात, असा आजवरचा अनुभव आहे. ठाणे महापालिकेच्या इतिहासात एखाद-दुसरा अपवाद वगळला तर या विभागाची सूत्रे नेहमीच आयुक्तांकडे राहिली आहेत. आर. ए. राजीव यांच्यासारख्या आयुक्ताने बडय़ा बिल्डरांच्या नियमबाह्य़ बांधकामांना नोटिसा बजावत त्यांच्याकडून कोटय़वधी रुपयांचा दंड वसूल केला होता.
राजीव यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी आलेले असीम गुप्ता यांनी बडय़ा बिल्डरांचे वादग्रस्त प्रस्ताव मार्गी लावल्याचे बोलले जाते. त्यामुळे गुप्ता यांच्या बदलीनंतर आयुक्तपदी आलेले संजीव जयस्वाल हे शहर विकास विभागाचा कारभार कसा हाताळतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, शहर विकास विभागाचे प्रस्ताव थेट आपल्या नजरेखालून घालण्याऐवजी यासंबंधी अधिकार त्यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांच्याकडे सोपवले आहे. जयस्वाल यांची निवड झाल्यानंतर काही महिन्यांतच सुनील चव्हाण अतिरिक्त आयुक्तपदी रुजू झाले.महसूल विभागाचा गाढा अनुभव असलेले चव्हाण हे जयस्वाल यांच्या खास मर्जीतील अधिकारी म्हणून ओळखले जातात.
 शहर विकास विभागातील काही प्रस्तावांना यापूर्वी दिल्या गेलेल्या मंजुऱ्या चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. तसेच नव्याने दाखल झालेल्या काही प्रस्तावांविषयी तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. असे असताना अतिरिक्त आयुक्तांकडे या विभागाचा कार्यभार सोपविण्यात आल्याने याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, अशा प्रकारे एखाद्या अधिकाराकडे विभागाची जबाबदारी सोपविण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत. त्यामुळे कामकाजाच्या विकेंद्रीकरणाचा हा भाग असल्याची प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.