नागरिकांनी वेगळा केलेला कचरा पालिका कर्मचाऱ्यांकडून पुन्हा एकत्र

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागरिकांना ओल्या आणि सुक्या कचऱ्याच्या वर्गीकरणाचे आदेश देणाऱ्या महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी मात्र दोन्ही प्रकारचा कचरा एकत्रच संकलित करत आहेत. त्यामुळे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात अडथळे येत असून कचरा व्यवस्थापनात अडचणी निर्माण होत आहेत.

ओल्या कचऱ्यात उरलेले अन्न, खराब झालेल्या फळभाज्या, नारळ हाडे अशा विघटनशील घटकांचा समावेश असतो तर सुक्या कचऱ्यात प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, थर्माकोल, धातू अशा गोष्टींचा समावेश असतो. वसई-विरार शहर महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण हाती घेतले होते तेव्हा ओला व सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती केली होती. तसे आदेश नागरिकांना देण्यात आले होते. वर्गीकरण करता यावे म्हणून निळ्या आणि  हिरव्या रंगाच्या कचराकुंडय़ा देखील ठेवण्यात आल्या आहेत. परंतु कचरा संकलित करतानाच सफाई कर्मचारी ओला व सुका कचरा एकत्र करून वाहनात टाकतात.

मनसेचे नालासोपारा येथील अध्यक्ष प्रशांत खांबे यांनी याची छायाचित्रे पाठवून आयमुक्तांकडे तक्रार केली आहे. पालिका मोठा गाजावाजा करून स्वच्छता मोहीम राबवते. पण जर त्यांचेच कर्मचारी कचरा एकत्र गोळा करत असतील तर या अभियानाचा काय उपयोग असा सवाल त्यांनी केला आहे.

कचरा संकलनासाठी पालिकेला खर्च येतो म्हणून स्वच्छ भारत अभियानाच्या निर्देशानुसार पालिकेने नागरिकांवर उपभोक्ता कर लागू केला आहे. महापालिकेकडे कचरा वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठीची कोणतीही यंत्रणा नाही.

वर्गीकरण यंत्रणा राबविण्यासाठी २०१३-१४ मध्ये प्रशासनाकडे प्रस्ताव ठेवण्यात आला होता, आता नव्याने निविदा काढून प्रकल्प राबविला जाईल. तसेच आमच्या विभागाच्या वतीने प्रत्येक सोसायटीत ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी हिरव्या व निळ्या रंगाच्या कचराकुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी त्याचा योग्य वापर करावा.

– सुखदेव दरवेशी, प्रभारी साहाय्यक आयुक्त, स्वच्छता विभाग

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Categorization rule cracking from the corporation
First published on: 06-10-2018 at 02:39 IST