तीन दिवसीय शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये ख्यातनाम कलाकारांची हजेरी; रसिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती

अंबरनाथ : मराठी आणि हिंदी संगीत क्षेत्रातील ख्यातनाम कलाकारांनी तीन दिवसांचा अंबरनाथ शिवमंदिर आर्ट फेस्टिवल गाजविला. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित आणि लोकसत्ता माध्यम प्रायोजक असलेल्या या कार्यक्रमात जुबिन नौटीयाल, दिव्य कुमार, अनुषा मनी, वैशाली सामंत, तसेच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले तरुण गायक अशा सर्वानी आपल्या गायकीने फेस्टिवलचे तीन दिवस रसिकांना तृप्त केले. फेस्टिवलच्या पाचव्या पर्वात आतापर्यंतचे गर्दीचे सर्व विक्रम मोडीत निघाले.

शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा पहिला दिवस मराठी गायकांनी गाजवला. यावेळी गाणे सादर करताना पाश्र्वगायिका वैशाली सामंत.

सुमारे साडेनऊशे वर्षांपूर्वीचे शिलाहारकालीन शिवमंदिर अंबरनाथ शहराची सांस्कृतिक खूण आहे. ही खूण जपण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी या मंदिराच्या परिसरात दर्जेदार कलांचा उत्सव सुरू करण्याचे सुचवले होते. त्यानुसार कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी येथे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलची सुरुवात केली. डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून हा फेस्टिवल केला जात आहे. धार्मिक परंपरेला कलेची जोड देत संगीत, चित्रकला, शिल्पकला, मुद्राभिनय क्षेत्रातील जगप्रसिद्ध कलाकारांना येथे पाचारण करण्यात येते. या फेस्टिवलच्या निमित्ताने अंबरनाथ, बदलापूर ते थेट ठाणे आणि कर्जतपर्यंतच्या कला रसिकांना दर्जेदार कला अनुभवता येत आहे.

शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांनी विक्रमी गर्दी केली होती. मुख्य रंगमंचापासून मंदिराच्या मुख्यप्रवेशद्वारापर्यंत प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत होती.

यंदाचे फेस्टिवलचे पाचवे वर्ष होते. लोकसत्ता माध्यम प्रायोजक असलेल्या या फेस्टिवलमध्ये यंदाही संगीत, चित्रकला क्षेत्रातील जगविख्यात कलाकारांनी हजेरी लावली होती. रसिकांनी मोठय़ा संख्येने लावलेली हजेरी हे यंदाचे वैशिष्टय़ ठरले.  यंदाच्या वर्षांत फेस्टिवलची सुरुवात वैशाली सामंत, नागेश मोर्वेकर या मराठी गायकांनी केली. या वेळी अक्षया अय्यर, राजू नदाफ, अक्षता सावंत, विश्वजीत बोरवणकर, प्रसेनजीत कोसंबी, कविता राम आणि हर्षद नायबळ यांनी साथ दिली. दुसऱ्या दिवशी आताच्या पिढीच्या हिंदी आणि सुफी संगीताला पॉपची जोड देणाऱ्या दिव्य कुमार आणि अनुषा मनी यांनी गाजवला. तर जुबीन नौटीयाल याने फेस्टिवलची सांगता केली. संगीतक्षेत्रात अल्पावधीतच नावलौकिक मिळवत तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या जुबिनने फेस्टिवल वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. जुबिनच्या रॉक संगीत आणि गायकीला ऐकण्यासाठी रसिकांनी फेस्टिवलला विक्रमी गर्दी केली होती. त्यामध्ये तरुणाई मोठय़ा संख्येने उपस्थित होते. तब्बल ३० हजार क्षमतेचे मैदान कार्यक्रमाच्या तीन तास आधीच गच्च भरले होते. त्यानंतरही प्रेक्षकांचा ओघ सुरूच होता. जुबिनने नव्या आणि जुन्या गाण्यांना रॉक संगीताची जोड देऊन रसिकांची मने जिंकली.

शिवमंदिर आर्ट फेस्टिवलमध्ये आयोजित पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीलाही वाचकांनी चांगली पसंती दिली. अनेक वाचक पुस्तक खरेदी करताना पाहायला मिळाले.

मान्यवरांचीही फेस्टिवला हजेरी

यंदाच्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचे उद्घाटन खासदार संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते झाले. नगरविकासमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवमंदिराचा कायापालट करण्यासाठी १५ कोटींची घोषणा फेस्टिवलमध्ये केली. दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध अभिनेता सुनील शेट्टी, खासदार अनिल देसाई आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. तर शेवटच्या दिवशी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख, हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील आदींनी हजेरी लावली.

उत्तराखंडचा चित्रकार सुनील कुमार फेस्टिवलमध्ये रसिकांचे लक्ष वेधून घेत होता. कलेला कोणतेही बंधन नसते हे सांगताना दोन्ही हात नसलेला सुनील जेव्हा पायाने चित्र काढत होता, त्यावेळी रसिक गर्दी करून त्याची कला पाहत होते.

चित्र, मुद्राभिनय आणि बरेच काही

दरवर्षीप्रमाणे यंदाही जगविख्यात चित्रकारांची चित्र असलेले दालन रसिकांच्या पसंतीस उतरले. यंदा राज्यासह देशातील विविध भागांतील चित्रकारांनी फेस्टिवलला हजेरी लावली. मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय, विण्टेज कारचे प्रदर्शन रसिकांचे लक्ष वेधून घेत होते. खाद्यपदार्थाच्या स्टॉललाही खवय्यांनी चांगला प्रतिसाद दिला. पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीलाही वाचकांनी पसंती दिली.