कल्याणमधील तीन घरे फोडली; सुरक्षारक्षकास मारहाण
चड्डी-बनियन टोळीने कल्याण-डोंबिवली शहरात धुमाकूळ घातला असून, पोलीस यंत्रणा शहरात पहारा देण्यास कमी पडत असल्याचे चित्र आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास या टोळीने कल्याण पत्रीपुलाजवळील एका इमारतीतील तीन घरे फोडून दीड लाखाचा ऐवज चोरला असून, इमारतीच्या सुरक्षारक्षकालाही मारहाण केली आहे. शहरात गस्त सुरूअसल्याचा दावा पोलीस करीत असले, तरी त्यांच्या हातावर तुरी देत या सहा ते सात जणांच्या टोळीने धुमाकूळ घातला आहे. नागरिकांमध्ये या टोळीची दहशत पसरली असून घबराटीचे वातावरण आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात गेल्या काही महिन्यांपासून चड्डी-बनियन टोळीची दहशत आहे. डोंबिवलीनंतर आता कल्याण शहराला या टोळीने लक्ष्य केले आहे. कल्याण पूर्वेतील पत्रीपूल परिसरातील सवरेदय सागर सोसायटीमधील तीन घरे या टोळीने बुधवारी मध्यरात्री फोडली. बाजारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास ही घरफोडी झाली. इस्माईल शेख यांच्या घरातील एक लाख २२ हजाराचा मुद्देमाल या चोरटय़ांनी चोरला. तसेच सईद शेख यांच्या घरातही चोरीची घटना घडली आहे. इमारतीत चोर शिरले असल्याचे येथील सुरक्षा रक्षक इमामुद्दीन याच्या लक्षात आले. यावेळी चोरटे तिसरे घर फोडण्याच्या तयारीत होते. सुरक्षारक्षकाने त्यांना अटकाव केला असता चोरटय़ांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोसायटीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चोरटे कैद झाले असून त्यांनी चड्डी-बनियन असा पोशाख परिधान केलेला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही सांगितले.
काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीतही अशाचप्रकारे घरफोडी करताना या टोळीचे चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. या टोळीने कल्याणमध्येही आता घरफोडी केल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली असल्याचे बोलले जात असले, तरी नागरिकांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण आहे. पोलीस गस्त घालत असल्याची केवळ बतावणी करतात. त्यांचा जर शहरात पहारा आहे तर अशा चोरीच्या घटना घडतातच कशा? असा प्रश्न रोहित नायर याने केला. शहरात हे चोरटे खुलेआम फिरत असून सीसीटीव्हीमध्ये ते कैद होत आहेत. पोलीस यंत्रणेचे हे अपयश आहे, अशी प्रतिक्रिया संचित पटेल यांनी व्यक्त केली.