ठाणे : विहंग हिल्स गृहसंकुल ते घोडबंदर रोडवरील नागला बंदरदरम्यान सुरू असलेल्या वडाळा ते ठाणे या मेट्रो ४ च्या मार्गिकेसाठी खांबांवर तुळई टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे २० ते २८ एप्रिल या कालावधीत दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ४.०० वाजेपर्यंत मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे.
ठाण्यात मेट्रो ४चे कासारवडवली ते गायमुखपर्यंत काम चालू आहे. या भागातील विहंग हिल्स गृहसंकुल ते नागला बंदर, घोडबंदर रोड या ठिकाणी मेट्रोच्या खांबांवर तुळई टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम २० ते २८ एप्रिल या कालावधीत दररोज रात्री ११.५५ ते पहाटे ४.०० वाजेपर्यंत वेदांत रुग्णालय, घोडबंदर रोड ठाणे या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यासाठी या भागातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नसल्याचे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे.
वाहतूक बदल असे
• मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रस्त्याच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना तत्त्वज्ञान विद्यापीठ, कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर या वाहनांना कापूरबावडी सर्कल येथून उजवे वळण घेऊन बाळकुम नाका, भिवंडी-आग्रा रोड, कशेळी, काल्हेर, अंजुरफाटा, भिवंडीमार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.
• तसेच इतर हलकी वाहने ही खांब क्रमांक ६१ ते ६८ वर तुळई टाकण्याच्या वेळी विहंग हिल्स येथून डावीकडे वळण घेऊन सेवा रस्त्याने नागला बंदर येथे उजवीकडे वळण घेऊन घोडबंदर रस्त्यामार्गे तर खांब क्रमांक ३ ते ४ आणि ३६ ते ३७ वर तुळई टाकण्याच्या वेळी एच.पी. पेट्रोल पंप, कासारवडवली बस थांबा येथून डावीकडे वळण घेऊन सेवा रस्ता ओवळा सिग्नल येथे उजवीकडे वळण घेऊन घोडबंदर रस्त्यामार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.
• मुंबईकडून कापूरबावडी जंक्शन, तत्त्वज्ञान विद्यापीठमार्गे घोडबंदर रस्त्याकडे जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना माजिवाडा गोल्डन डाईज पुलावर वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर या सर्व वाहनांना नाशिक रस्त्याने खारेगांव टोल नाका, मानकोली नाका, अंजुर फाटामार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes traffic ghodbunder metro works vihang hills housing complex ghodbunder road amy
First published on: 20-04-2022 at 03:20 IST